
सामना ऑनलाईन। गुवाहाटी
आसाममधील तिनसुकीया येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये उंदरांनी १० किंवा २० हजार नाही तर चक्क १२ लाख रुपयांच्या नोटा कुरतडल्याचे समोर आले आहे. ११ जून रोजी कुरतडलेल्या नोटांचा फोटो सोशल साईटवर व्हायरल झाला, त्यानंतर ही घटना समोर आली.
गेले अनेक दिवस या एटीएममधून पैसेच येत नसल्याची तक्रार ग्राहकांनी २० मे रोजी बँकेकडे केली होती. तेव्हापासून हे एटीएम बंद होते. त्यामुळे एटीएम मशीन दुरुस्त करण्यासाठी बँकेचे कर्मचारी तिनसुकीया येथे गेले होते. मशीन उघडताच त्यांना कुरतडलेल्या पैशांच्या ढिगारा दिसला. त्यात उंदीर मनसोक्त फिरत असल्याचं बघून कर्मचाऱ्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला.
११ जूनला एटीएमची देखभाल करणारी कंपनी ग्लोबल बिजनेस सॉल्यूशन्सचे (जीबीएस) कर्मचारी तिथे गेले होते. तेव्हा १२ लाख ३८ हजार रूपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचे व १७ लाख रुपयाच्या नोटा सुरक्षित असल्याचे त्यांना आढळले. जीबीएस कंपनीने १९ मे रोजी एटीएम मशीनमध्ये २० लाख रुपये टाकले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून एटीएम मशीनने काम करणे बंद केले होते.






















































