वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या? पोलीस दलात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमरावती

अमरावतीमधील शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे. रामसिंह चौहान असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये चौहान यांनी आपल्या आत्महत्येस पोलीस युक्त व उपायुक्त जबाबदार असल्याचे लिहिल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

रामसिंह चौहान हे शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. आपण वरिष्ठांच्या जाचाल कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. ‘गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, त्यामुळे मुलाला शिक्षणासाठी पैसे पाठवू शकत नसल्याच्या वैफल्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे’ चौहान यांनी लिहिले आहे. ‘पगाराविषयी आपण विचारले असता संबंधित लिपिकाने आपल्याला पोलीस आयुक्तांनी पगार न देण्याचे सांगितले’. त्यामुळे माझ्या आत्महत्येस पोलीस आयुक्त व उपायुक्त जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याशीवाय माझा मृतदेह ताब्यात घेऊ नका, असेही त्यांनी लिहिले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.