इंडोनेशियामध्ये तुरुंगाला लागली भीषण आग, 41 कैद्यांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळील एका तुरुंगामध्ये बुधवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये कमीत कमी 41 कैद्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 39 कैदी गंभीर जखमी झाले आहेत. कायदा आणि न्याय मंत्री विभागाचे प्रवक्ते रिका अपरिआंती यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राजधानीपासून जवळ असणाऱ्या तांगरांग तुरुंगातील ‘सी’ ब्लॉकमध्ये बुधवारी आग लागली. या भागामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींना ठेवण्यात येते. या आगीमध्ये ‘सी’ ब्लॉकमधील जवळपास 41 कैद्यांचा मृत्यू झाला. आग नक्की कोणत्या कारणाने लागली याबाबत माहिती मिळालेली नाही. तुरुंग अधिकारी याचा शोध घेत आहेत.

अधिक माहिती देताना अपरिआंती यांनी सांगितले की, तागंरांग तुरुंगाची क्षमता 1225 कैद्यांना ठेवण्याची आहे. मात्र येथे जवळपास 2 हजार कैद्यांना ठेवण्यात आले होते. आग लागली तेव्हा ‘सी’ ब्लॉकमध्ये 122 कैदी होते. पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाने आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सर्व जखमी कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.