
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी पंतप्रधान, भाजपचे श्रेष्ठ नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक महात्मा गांधींच्या ‘राजघाट’शेजारीच उभारले जाणार आहे. 25 डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल आणि 26 जानेवारी 2019 रोजी त्याचे उद्घाटन होईल, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली. 25 डिसेंबरला वाजपेयींची 94 वी जयंती असून तत्पूर्वीच काम पूर्ण केले जाणार आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर राजघाटाशेजारीच असलेल्या स्मृतिस्थळावर अंत्यसंस्कार झाले. याच ठिकाणी ‘अटलघाट’ उभारण्याची तयारी भाजपने केली आहे. हे स्मारक उभारणाऱ्या कंपनीला 15 सप्टेंबरनंतर काम सुरू करण्यास सांगितले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याच हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्याचा भाजपचा मानस आहे.
भाजपचा प्रवास आतापर्यंत जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याभोवतीच केंद्रीत होता, मात्र राष्ट्रीय स्मृतिस्थळ येथे आपल्या एका नेत्याची स्मारक उभारण्याची संधी पहिल्यांदाच भाजपला मिळत आहे. 2013 मध्ये यूपीए सरकारने राष्ट्रीय स्मृतिस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.
बंगल्याचे स्मारक होणार नाही!
राजधानीत येणारे पर्यटक जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मारकाला आवर्जून भेट देतात. अटलजींचे स्मारकही आम्ही भव्य-दिव्य करणार असल्याचे एका भाजप नेत्याने सांगितले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सरकारने राजधानीतील काही शासकीय निवासस्थानांचे रूपांतर स्मारकात करू नये असा निर्णय घेतला होता.
2014 मध्ये माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांनी तुघलक मार्गावरील बंगल्यात त्यांचे वडील चौधरी चरणसिंह यांचे स्मारक उभारावे अशी मागणी केली होती, पण सरकारने ती अमान्य केली होती. म्हणूनच कृष्ण मेनन मार्गावरील वाजपेयींच्या बंगल्याचे स्मारकात रूपांतर होणार नाही असा निर्णय झाल्याचे या नेत्याने सांगितले.
summary- atalghat memorial to be built near rajghat new delhi
























































