
सामना प्रतिनिधी । कोपरगाव
उच्च विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागावी यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्य. व उच्च माध्यमिक गुरुकुलाने कृतियुक्त वैज्ञानिक व भौगोलिक सहलीचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत 72 विद्यार्थ्यांनी मुंबई ते त्रिवेंद्रम असा विमानप्रवास करुन थुंबा येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटर( इस्त्रो) ला भेट दिली. रस्ते मार्ग, हवाई मार्ग, समुद्र मार्ग व रेल्वे मार्ग या सर्वांचा वापर करुन 4127 कि.मी. ची सफर केली.
इस्त्रोमधील भारतीय अवकाश संशोधनाचे प्रदर्शन, चित्रफित तसेच शास्त्रज्ञांबरोबरील संवादाने विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्ती जागृत झाली. सहलीच्या पुढील टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी दक्षिण भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारक बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांचा संगम, मदुराईतील द्राविडीयन शिल्पकलेचा उत्कृष्ट अविष्कार असलेले मिनाक्षी मंदिर व रामेश्वरम येथील रामनाथस्वामी शिवमंदीराबरोबरच हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांचा संगम असलेल्या रामसेतुसाठी प्रसिध्द अशा धनुष्कोंडी या ठिकाणाला भेटी दिल्या. सहल यशस्वी करण्यासाठी प्राचार्य निरंजन डांगे, विभाग विभाग प्रमुख सागर आहिरे, सचिन डांगे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे, शिक्षक गणेश रासने, नयना शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.






























































