
>> आत्माराम नाटेकर
कोकणातील मालवणात तीन वर्षांनी ‘गावपळण’ होते. चिंदर येथील गावकऱ्यांसाठी ती आनंदाची पर्वणीच असते. गेल्या कित्येक पिढय़ा ही अनोखी परंपरा सुखेनैव सुरू आहे. ती केव्हा चालू झाली, कोणी केली आणि का केली याचे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. देवाची आज्ञा होईल तेव्हा गाव सोडायचा आणि गावकुसाबाहेर आपापल्या खोपटय़ात राहायचं. तीन दिवस आणि तीन रात्री येथे मुक्काम करायचा. ग्रामदैवताने पुन्हा हुकूम दिल्यावर घरी (गावात) परतायचं, हीच ती गावपळण!
‘गावपळण’ म्हणजे सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबकबिल्यासह कुत्रे-मांजरी-कोंबडी आणि गुरे-वासरांसह गावाच्या सीमेबाहेर जाऊन वस्ती करणे. आता ही प्रथा का पडली कोण जाणे! पूर्वी गावात प्लेग आला, कुणाकडे प्लेगने एखादा उंदीर मरून पडला की सारं गाव वस्ती सोडून दूर शेतमाळावर राहावयास जात असे. दूषित वातावरणापासून मोकळय़ा हवेत जाणे हा त्यामागचा उद्देश असावा. काहींच्या मते चिंदरगाव मूळचा ओसाड होता. देवाचा कौल घेऊन तो वसवला गेला आणि म्हणूनच दर 3 वर्षांनी हा गाव ओस टाकला जातो. गुरंढोरं, कोंबडी, कुत्री, मांजरं सर्वांनाच आपल्यासोबत घेऊन गावाबाहेर राहावं लागतं. यातून म्हातारीकोतारी माणसं वा ओल्या बाळंतिणीही सुटत नाहीत.
तब्बल तीन दिवस एका वेगळय़ा वातावरणात सर्व गावकरी गुण्यागोविंदाने नांदतात. एकजुटीमध्ये किती ताकद आहे हे दर्शविणारी प्रथा! आपापसातील मतभेद गाडून टाकून विशाल आकाशाखाली आणि लाल मातीच्या गालिच्यावर बंधुभावाने जोपासलेली ही रूढी ‘वसुधैव कुटुंबकम्’ची प्रचीती आणून देते. लहानमोठय़ा 12 वाडय़ांनी जोडला गेलेला हा गाव. अर्धा गाव नदीच्या विळख्यात तर अर्धा कुपेरीच्या कुशीत विसावलेला. गावाबाहेर राहायचं म्हणजे खोपटं काढावं लागतं. बांबू, मेढी, पुंबयाचे दोर, माडाची झावळे यांच्या सहाय्याने खोपटी उभी राहतात. प्रत्येक वाडीच्या खोपटाची जागा ठरलेली. ही खोपटी म्हणजे आपल्या धारावीसारखी लांबच लांब झोपडपट्टी. मात्र ती 3 दिवसांनंतर हलणारी. उघडय़ा माळरानावर ही खोपटी उभारली असल्याने जागेची चणचण नसतेच. प्रत्येकाचा संसार आपापल्या स्वतंत्र खुराडय़ात. प्रत्येकाची चूल वेगळी अन् तिही तीन दगडांची. सीमेबाहेर जत्रेचं स्वरूप येतं.
काही निराधार व्यक्ती आपापल्या नातेवाईकांच्या खोपटय़ात दाखल होतात. ज्या घरचा कर्तबगार माणूस परगावी असेल त्याचे खोपटे उभे राहात नाही. मग या घरची सून माहेरच्या आसऱ्याला येते आणि वडिलांच्या खोपटय़ात दाखल होते. माहेरी यायला तेवढंच निमित्त मिळतं. तीन दिवस माहेरच्या लोकांच्या सहवासात राहायला मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत असतो. कित्येक वेळा वार्धक्यामुळे पिंवा कामाच्या व्यापामुळे पाहुण्यांकडे – नातेवाईकांकडे जायला मिळत नाही, पण अशा वेळी मात्र सर्वांच्या गाठीभेटी होतात. एकमेकांची विचारपूस होते. सुखदुःखाच्या चार गोष्टी होतात.
पूर्वी या खोपटय़ात पंदील, चिमणी वा टेंभे लावले जायचे. मोठमोठय़ांची खोपटी विसंगत वाटली तरी पेट्रोमॅक्सने उजळून जायची. आता माळरानावर विजेचे खांब गेले आहेत. एकदोन घरेही उभी राहिली आहेत. त्यामुळे आता या खोपटय़ात दिवाळी साजरी होत असल्याचा भास होतो. या माळात कोणी मोलमजुरी करीत नाही. गुरांना बांधूनच ठेवावे लागते, त्यांना पाणी देणे, पोटापाण्याच्या झऱ्यावरून पाणी घेऊन येणे ही कामे नित्याचीच. खोपटय़ात पत्त्यांचे डाव रंगतात, काही जण मासे पकडण्यासाठी तर काही जाळे घेऊन शिकारीसाठी जातात. बैलांच्या, कोंबडय़ांच्या झुंजी हे तर आकर्षणच. रात्री-अपरात्री आरवणारे कोंबडे, रात्रभर हंबरणारी वासरे, महिलांच्या फुगडय़ा, ओव्या आणि पुरुष मंडळींची भजने, दशावतार हे तर करमणुकीचे खेळ.
थंडीचे दिवस असल्याने लोक कोंबडय़ाच्या पहिल्या बांगेबरोबरच उठतात आणि विशेष म्हणजे हा कोंबडाही अवेळीच ओरडतो. रात्रभर खोकून खोकून हैराण झालेला एखादा म्हातारा मग खोपटय़ाच्या मागे शेकोटी पेटवतो. कुणीतरी जाळ केलाच हे पाहून अंगाभोवती शाल वा घोंगडी लपेटलेले एक एक शेकोटीभोवती जमा होतात. कुपेरीआडून सूर्यनारायणाचे दर्शन होईपर्यंत त्यांचा हा जाळ चालूच असतो. तीन रात्री काढल्यानंतर मात्र सर्वांचे कान लागलेले असतात गावाकडे…ढोलाच्या आवाजाकडे. तीन दिवसांचा हा वनवास खरोखरच सुखावणारा असतो.
अनेकांना ही अंधश्रद्धा वाटते. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्तेही पूर्वी येऊन गेलेत. अनेकांनी आपापल्या बुद्धिमत्तेने त्याला अनेक उपमा दिल्यात, पण ही अंधश्रद्धा नसून चिंदर ग्रामस्थांचा सुज्ञपणा आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. विज्ञानाशी सांगड घालत या परंपरेकडे पाहताना असे दिसते की आपली भारतीय संस्कृती निसर्गाशी किती एकरूप झाली आहे. त्यामुळे त्याकाळी विज्ञान-तंत्रज्ञान या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यापलीकडच्या असल्याने प्रत्येक गोष्टीत देवधर्म आणला की माणूस त्याचे अनुकरण करतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वाढते प्रदूषण, रोगराई यातून मुक्तता व्हावी याकरिता तीन दिवस निसर्गाच्या सान्निध्यात गावाच्या वेशीबाहेर एकत्र राहण्याची परंपरा म्हणजे ‘लॉकडाऊन’ म्हणावे लागेल. कोरोना महामारीच्या काळात कोणताच पर्याय उपलब्ध नसताना घरात स्वतःला बंद करून घेणे हाच एक पर्याय साऱ्या जगासमोर होताच. सर्वांनी त्याचे पालन केले.
चिंदर गावचे जयंत रेवडेकर आणि मकरंद केळकर यांनी चिंदर गावच्या गावपळणीचे विविध माध्यमांद्वारे सुंदर चित्र रेखाटले आहे. दर तीन वर्षांनी संपूर्ण गाव रिकामे करून वेशीबाहेर संसार थाटण्याची ही गावपळण परंपरा म्हणजे ग्रामसंस्कृतीचे लेणे आहे. पूर्वजांनी हवापालटासाठी केलेली ही गावपळण म्हणजे आनंदाची पर्वणीच. किमान एकदा तरी या अनोख्या परंपरेचा यथेच्छ आनंद लुटण्यासाठी चिंदर गावच्या माळरानावर जायलाच हवे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
























































