
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
मुंबई, ठाणे आणि संभाजीनगरात ऑगस्ट ते जानेवारीदरम्यान घातपाती कारवाया करण्याचा कट रचणाऱ्या नऊ जणांना नुकतेच एटीएसने पकडले. त्यांच्या आणखी एका साथीदाराला एटीएसने ठाण्यातील मुंब्रामधून अटक केली आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह आणि मोबाईल दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) जप्त केला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाला ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर शहरातील गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याच कट उमत मोहंमदीया ग्रुपने रचला होता. याबाबतची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाल्यामुळे त्यांनी उमत मोहमदीया ग्रुपवर पाळत ठेवत संभाजीनगरातील पाच आणि मुंब्रा येथील चार अशा एकूण नऊ जणांना 22 जानेवारीला अटक केली होती. ते नऊ जण पोलीस कोठडीत असतानाच चौकशीदरम्यान त्यांना उमत मोहंमदीया ग्रुपच्या गुप्त बैठकीस सुरवातीपासून हजेरी लावणाऱ्या तलाह ऊर्फ अबु बकर हनिफ पोतरीक (24 एमरॉल्ड टॉवर मुंब्रा) यांची माहिती मिळाली. त्याच्यावर एटीएसने पाळत ठेवली. त्याला शनिवारी सांयकाळी मुब्य्रांतून अटक केली. त्याच्याकडून एटीएसने लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह जप्त केला आहे.
अबु बकरला विशेष न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या समोर हजर करण्यात आले. अतिरिक्त लोकअभियोक्त सतीश मुंडवाडकर यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, इसीसच्या नऊ जणांच्या चौकशीमध्ये अबु बकरचे नाव समोर आले असून त्यांनी रासायनिक द्रव्य कुठून आणले, कोणत्या शहरातील जलकुंभामध्ये विषारी रासायनिक द्रव्य मिळविणार होते याची माहिती मिळवायची आहे. त्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत अबुबकरला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे संभाजीनगर आणि मुंब्रा येथे एकाच वेळी छापा मारून मोहसीन सिराजुद्दीन खान (32, दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (23, कैसर कॉलनी), महंमद सरफराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (23, राहत कॉलनी), महंमद तकी ऊर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (20, कैसर कॉलनी) , ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (32, मुंब्रा ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (28, मोतीबाग, मुंब्रा ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (21, मुंब्रा ठाणे) या नऊ जणांना ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडी दरम्यान दहाव्या आरोपीचे नाव एटीएसला मिळाल्यामुळे त्यांनी शनिवारी सायंकाळी 4 वाजता त्याला अटक केली. पोलीस निरीक्षक विजयकांत जैस्वाल यांच्या तक्रारीवरुन दहा जणांविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































