
दहशतवादविरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटने बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी- विक्री करणाऱ्या 11 जणांना पकडले. वेगवेगळ्या नऊ ठिकाणी छापा मारून ही कारवाई करत पोलिसांनी उच्च प्रतीची 13 पिस्तुले आणि 36 जिवंत काडतुसे हस्तगत केली.
एक व्यक्ती बेकायदेशीरपणे फॅक्टरी मेड उच्च प्रतीची पिस्तुले तसेच जिवंत काडतुसे विकत असून त्याने अनेकांना शस्त्रांची विक्री केली असल्याची खबर एटीएसच्या काळाचौकी युनिटला मिळाली. त्यानुसार पथकाने मुलुंड येथून शस्त्र विकणाऱ्याला उचलले. चौकशीत त्याने दहाजणांना पिस्तुले, काडतुसे विकल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कांदिवली, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, उरण येथील नऊ ठिकाणी छापा मारून शस्त्र खरेदी करणाऱ्या दहाजणांना पकडले. त्यांच्याकडून बेकारदेशीरपणे खरेदी केलेली 13 पिस्तुले आणि 36 काडतुसे जप्त केली. ही शस्त्रे मुख्य आरोपीने कुठून आणली, ती किती रुपयांत तसेच अजून कोणाला विकली याचा काळाचौकी युनिट शोध घेत आहेत.





























































