लाईट का घालवलीस? विचारत वीज वितरण कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालयाची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

लाईट का घालवलीस? असा जाब विचारत अर्धापूर येथील 33 केव्ही उपकेंद्रातील खुर्च्या, टेबलची तोडफोड करत उपस्थित कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणारे सचिन उत्तमराव देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री अर्धापुर उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 220 केव्ही वाघाळा उपकेंद्रात बिघाड झाल्याने अर्धापूर शहरातील वीजपुरवठा रात्री 7 वाजून 44 मिनिटाला खंडीत झाला होता. यावेळी रात्री 8 वाजून 15 मिनिटाला सचिन उत्तमराव देशमुख अर्धापूर उपकेंद्रात येवून तेथे कर्तव्यावर उपस्थित असलेल्या अब्दूल रहीम पी. शेख बशीर या प्रधान तंत्रज्ञास लाईट कशी गेली? असा प्रश्न करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाईट वाघाळा उपकेंद्रातून गेली आहे, एक तासात येईल असे सांगूनही काहीही न ऐकता सचिन देशमुख याने मारहाण करणे चालूच ठेवले. याप्रसंगी सोडवा सोडवी करण्यास गेलेले दुसरे कर्मचारी अभिजीत पाठक यांनाही मारहाण केली. त्याचबरोबर उपकेंद्रातील खुच्र्या व टेबलाची नासधूस करत शासकीय कामात दहशत निर्माण करून अडथळा निर्माण केला. या प्रकरणी सचिन उत्तमराव देशमुख याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत भादवि कलम 353, 323, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.