
ओळखीतून आपल्या पत्नीसोबत बोलत असल्याच्या संशयावरून टोळक्याने तरूणाचा पाठलाग करून मोटारीने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्याला खाली पाडून कोयत्याने वार करीत प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना रविवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव खुर्दमधील लिपाणे वस्तीवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
किरण कैलास इंगळे (वय 22), जय पांडुरंग निकम (वय 21) आणि शेखर अंकुश दिघे (वय 20, सर्व रा. दत्तनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमर ओंबासे असे वार केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी अजित ओंबासे (वय 34, रा. आंबेगाव खुर्द ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर कुटूंबियासह आंबेगाव परिसरात राहायला आहे. तेथे त्याची एका आरोपीच्या पत्नीशी ओळख आहे. त्या ओळखीतून अमर पत्नीसोबत बोलत असल्याचा संशय आरोपीला होता. त्याचा राग काढण्यासाठी रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमर दुचाकीवरून कामाला जात होते. त्यावेळी जांभुळवाडीतील लिपाणे वस्तीवर किरण, जय आणि शेखरने अमरच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. आरोपींनी अमरच्या डोक्यात, दोन्ही हातावर, पाठीवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे तपास करीत आहेत.






























































