युवासेना मराठवाडा विभागीय सचिव विपुल पिंगळे यांच्यावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना युवासेना सहसचिव तथा मराठवाडा विभागीय सचिव विपुल पिंगळे यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवाजी महाराज चौकात (जिल्हा परिषदच्या समोर) परिसरात घडली.

या हल्ल्यात पिंगळे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवाजी बटेवाड यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन विपुल पिंगळेंचा जबाब नोंदविला. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

विपुल पिंगळे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेचे धडाडचे कार्यकर्ते आहेत. त्याच अनुषंगाने पक्षाने त्यांच्याकडे युवासेना मराठवाडा विभागीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काही कामानिमित्त ते शहरातील जिल्हा परिषदेच्या समोर रोडवर आपल्या गाडीत थांबले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागे एक क्रेटा (MH 23 BC 3787) गाडी होती. या गाडीच्या चालकाने जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. हॉर्न का वाजवता, असे पिंगळे यांच्या चालकाने विचारले असता, 5-6 जणांनी पिंगळे यांच्या चालकास शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पिंगळे  गाडीतून खाली उतरले. तेव्हा त्या मारेकऱ्यांनी पिंगळे यांच्यावर दगडाने हल्ला केला. यामध्ये पिंगळे हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवाजी बटेवाड यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात जाऊन विपुल पिंगळेंचा जबाब नोंदविला.

या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान हल्लेखोरांनी नेमका कोणत्या कारणास्तव हल्ला केला, हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.