घोडेगावात कांद्याला क्विंटलला चार हजारांचा भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान

onion-market

कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार घोडेगाव येथील लिलावात गावरान उन्हाळी कांद्याला क्विंटलला तब्बल चार हजारांचा भाव निघाला. कांद्याचे दर जवळपास एक महिन्यापासून वाढत असल्याने कांदा चार हजारी पार झाला. वाढीव दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

बुधवारी (दि. 28) घोडेगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव पार पडले. नेवासा तालुक्यासह नगर, गंगापूर, राहुरी आदी भागांतून कांदा मोठय़ा  प्रमाणात दाखल झाला होता. 264 गाडय़ांतून 46 हजार 887 गोण्यांची आवाक झाली. फुल गोळा माल कांद्याला 3900 ते 4000 क्विंटलला दर मिळाला. मुकुल मोठा 3800 ते 3900, मीडियम मोठा 3700 ते 3800. गोल्टी 3000 ते 3300. गोल्टा 3400 ते 3700. जोड कांदा व बदलामाल 2000 ते 2500 असे दर निघाले. कांदापिकातून हमखास श्वाश्वत उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल आता कांदा पिकाकडे वळू लागला आहे. उसाऐवजी कांदापीक घेण्यासाठी शेतकरी आता पुढे येत आहेत.