
संभाजीनगर येथील विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ असे नाव देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ नामकरण करण्याबाबत अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदीप पुरी यांना पाठवले आहे.
संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिवांच्या पातळीवरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार संभाजीनगर विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर जारी करावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हरदीप पुरी यांना पाठवलेल्या स्मरणपत्रात नमूद केले आहे.


























































