
शहरात सलग चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आज मंगळवारीदेखील दिवसभर रिपरिप सुरू होती. मात्र, सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. एक तास झालेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. शहरातील नाले भरून वाहू लागले. वस्त्या वस्त्यांमध्ये, रस्त्या-रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. अनेक भागांतील घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बुडाली. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बैलपोळा सणालाही पावसाने हजेरी लावत बैलांचे शिंग भिजवले. त्यामुळे बळीराजाही सुखावला. आज मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. शहराच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी पावसाने विश्रांती चेतली असली तरी रात्री सात वाजेच्या सुमारास मात्र शहराला धुवाधार पावसाने झोडपून काढले. एक तास कोसळलेल्या पावसामुळे नाले भरून वाहू लागले. सखल भागात पाणीच पाणी झाले. नाल्यांच्या काठावरील आणि सखल भागांतील वसाहतींमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यासोबतच अनेकांच्या पार्किंगसह तळमजल्यातील दुकानांमध्ये पाणी पाणी झाले. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. भरपावसात पाणी काढण्यासाठी दमछाक झाली. सुखना आणि खाम नदी दुथडी भरून वाहत होती.
शहरातील नारेगाव, मसनतपूर, चिकलठाणा, हीनानगर, जाधववाडी, मिसारवाडी, पिसादेवी, आंबेडकरनगर, हर्मूल, जटवाडा, स्वामी विवेकानंदनगर, उद्धव पाटीलनगर, आरेफ कॉलनी, भीमनगर, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, छावणी, पडेगाव, मिटमिटा, विटखेडा, नक्षत्रवाडी, काचंनवाडी, सातारा, देवळाई, सादातनगर, नागसेननगर, गारखेडा, जयभवानीनगर, जुना मोढा, संजयनगर, भवानीनगर,
सिडको-हडको, पुष्पनगरी, मुकुंदवाडी व रामनगर यांसह जुन्या शहरातील उल्कानगरी, श्रेयनगर, जवाहरनगर, सहकारनगर, उत्तमनगर, समर्थनगर, क्रांतीचौक, सिल्लेखाना, जुना बाजार, किराडपुरा, नेहरूनगर, बुढीलेन, सिटी चौक, कैलासनगर, कटकटगेट, रोशनगेट, गणेश कॉलनी, बायजीपुरा अशा अनेक भागांत पावसाचे पाणी साचले आहे. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. अनेक भागांत गुडघाभर पाणी साचले होते. अनेक भागांतील चारचाकी वाहने पाण्यातून वाहू लागली.
अग्निशमन दलाला कॉलवर-कॉल
संभाजीनगर शहर व परिसराला आज मंगळवारी रोजी रात्री आभाळ फाटल्यागत पावसाने अक्षरश झोडपून काढले. धोधो कोसळलेल्या पावसाने शहर जलमये झाले असून घरा-घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. आपदग्रस्त नागरिकांचे मदतीसाठी अग्निशमन दलाला कॉलवर-कॉल धडकले, मात्र, या विभागाकडे मनुष्यबळाची वाणवा आणि वाहनांच्या कमतरतेमुळे आवश्यक तेथे वेळेत मदत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
उपकेंद्रे बंद, शहर अंधारात
धुवाधार पावसाने आज मंगळवारी रोजी रात्री शहरात काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळून तसेच बिघाड होऊन वीजपुरवठा खांडित झाला. महावितरणची सिडको, सूतगिरणी, शिवाजीनगर, पन्नालालनगर, छावणी, समाधान कॉलनी, पॉवर हाऊस, बायजीपुरा व रोशनगेट ही ३३ केव्ही उपकेंद्रे बंद पडली. तसेच ब्रिजवाडी, टाऊन सेंटर, चिकलठाणा एमआयडीसी परिसरातही बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तातडीने बिघाड शोधण्याचे काम हाती घेऊन दुरुस्ती केली. त्यामुळे अनेक उपकेंद्रे सव्वातासांत सुरू झाली. काही ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने झाड हटवून दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू होते. शहरातील अनेक भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता.
कंट्रोल रुम कोमात, अग्निशमन विभागही व्यस्त
पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी झाल्यास, पडझड झाल्यास तातडीने नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेने कंट्रोल रुम सुरू करीत असल्याची घोषणा केली. परंतु मंगळवारी शहरावर ढगफुटी झालेली असताना महापालिकेचे कंट्रोल रुम कोमात गेल्याची प्रचिती आली. कंट्रोलरुमच्या फोन नंबरवर फोन केल्यावर त्यावर सातत्याने नो रिप्लाय मिळत होता. मनपाच्या सुरक्षा कक्षातून देखील प्रतिसाद मिळत नव्हता.
दुसरीकडे अग्निशमन विभाग कमालीचा व्यस्त होता. घरांमध्ये व वसाहतींमध्ये पाणी शिरल्याचे अनेक कॉल्स या विभागाकडे आले. कॉल घेतानाच या विभागाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक झाली. कोणत्याही प्रकारची ठोस माहिती या विभागाकडून मिळू शकली नाही. अग्निशमन विभागाचे प्रमुख देखील ठोस माहिती देण्यास असमर्थ ठरले. नागरिकांना देखील मदत मिळू शकली नाही.


























































