संभाजीनगर शहरात म्युकरमायकोसिसचे 201 रुग्ण दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रक्तदाब आणि मधुमेह आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर म्युकरमायकोसिसच्या (बुरशीजन्य)आजाराला सामोरे जावे लागत आहे. दिड महिन्याच्या कालावधीत 201 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून त्यापैकी 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असा अहवाल महापालिकेकडे खासगी रुग्णालयाकडून सादर करण्यात आला आहे.

शहरात कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या आजाराने जास्त चिंता निर्माण केली आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्यामुळे व शासनाच्या माध्यमातून या आजारावर महात्मा फुले जिवन आरोग्य योजनेतंर्गत उपचार केले जाणार आहेत. तरी देखील नातेवाईकांच्या समोर म्युकरमायकोसिस आजाराबरोबरच आर्थिक प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

रक्तदाब आणि मधुमेह आजार असलेल्या नागरिकांना कोरोना आजार होऊन गेल्यानंतर हा आजार होत असल्यामुळे या आजाराबद्दल गांभिर्य अधिकच वाढले आहे. म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असल्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना फंगल इंन्फेक्शन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णांना नाकापासून (सायनासिस) फंगल इंन्फेक्शनला सुरूवात होते. पुढे डोळे, जबडा आणि मेंदूमध्ये त्याचा फैलाव होतो. त्यामुळे कोरोनाचा उपचार घेऊन घरी परतलेल्या नागरिकांनी तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे आहे.

दीड महिन्यातील रुग्णांची माहिती पाठवली

त्यामुळे महापालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांकडून म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांबद्दल माहिती मागवली होती. संबंधित रुग्णालयात दाखल असलेले म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांची माहिती पाठवावी असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले होते. त्यानुसार या विभागाकडे शहरातील सहा रुग्णालयांनी माहिती पाठवली आहे. या माहितीवरुन 1 एप्रिल ते 15 मे दरम्यान म्युकरमायकोसिस आजाराचे 201 रुग्ण दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी काही रुग्ण दहा मार्च पासून देखील रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत.

स्टॅरॉइटचे 148 तर ऑक्सिजनची कमतरता असलेले 110 रुग्ण

महापालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमजीएम हॉस्पिटलमध्ये 76, एशियन हॉस्पिटलमध्ये 24, कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये 5, धुत हॉस्पिटलमध्ये 3, अ‍ॅपेक्स हॉस्पिटलमध्ये 43 तर घाटी रुग्णालयात 50 रुग्ण दाखल झाले आहेत. या पैकी मधुमेही रुग्णांची संख्या 76, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या 110, स्टॅरॉइटच्या रुग्णांची संख्या 148 इतकी आहे.

एकाच रुग्णाला एका पेक्षा जास्त व्याधी असलेल्यांचा देखील यात समावेश आहे. 201 रुग्णांपैकी 16 जण आतापर्यंत दगावले असून सध्या सात जणांवर उपचार केले जात आहेत. महापालिकेने सर्व रुग्णालयांना त्यांच्या कडे दाखल असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांची रोजच्या रोज माहिती कळवणे आता बंधनकारक केले आहे.