संभाजीनगर – हर्सूल कचरा डेपोला आग, पत्र्याचे शेड जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या वतीने हर्सूल येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा डेपोला आज सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पत्र्याचे शेड जळून खाक झाले. तसेच खासगी संस्था असलेल्या इको-सत्वच्या दोन बेलिंग मशीन जळाल्याने मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.

हर्सूल येथे दररोज दिडशे टन कच-यावर प्रक्रिया करणा-या क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. सध्या या ठिकाणी सुक्या कच-यावर प्रक्रिया सुरू आहे. तीन प्रभागतील सुका कचरा या ठिकाणी आणला जातो. महापालिकेने प्रकल्प उभारण्यासाठी पत्र्याचे शेड उभारले आहे. बाजूलाच सुक्या कच-यावर प्रक्रिया करण्याचे काम खासगी संस्था असलेल्या इको-सत्वच्या माध्यमातून केले जाते.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कच-याला अचानक आग लागल्याने धुराचे आणि आगीचे लोळ उठले. गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी धावाधाव केली. मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाले. दोन तासांत आग आटोक्यात आली. घनकचरा विभाग प्रमुख तथा उपायुक्त सोमनाथ जाधव, अग्निशमन दलाचे प्रमुख राजू सुरे यांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. या आगीत कच-यासह पत्र्याचे शेड जळून खाक झाले. तसेच एनजीओ संस्थेच्या दोन बेलिंग मशीन जळून नुकसान झाले. असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.