मदरशातील 67 मुलींना दावतच्या बिर्याणीतून विषबाधा, दोघींची प्रकृती गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

पडेगाव येथील कासंबरी दर्गा परिसरातील मदरशातील 67 मुलींना दावतच्या बिर्याणीतून विषबाधा झाली. त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघींची प्रकृती गंभीर आहे, इतरांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास झिने यांनी सांगितले.

पडेगाव परिसरात कासंबरी दर्गा परिसरात राबिया बसरीया लिल बनात ह्य़ा मुलींची मदरसा आहे. या मदरशात राहणाऱ्या  विद्यार्थिनींना समाजातील लोक समाजिक भावनेतून दावत देत असतात. मंगळवारी, सिल्लेखाना येथील सलमान कुरेशी यांच्याकडे मुलींना संध्याकाळची बिर्याणीची दावत होती. साडे सातच्या सुमारास मुलींनी भोजन केले. त्यानंतर त्यांना एका टेम्पोतून  मदरशाकडे नेण्यात आले. दरम्यान, प्रवासात काही मुलींना उलट्या आणि मळमळ सुरु झाली. मदरशात पोहचल्यानंतर बहुतांश मुलींची प्रकृती खालावली. घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने या मुलींना घाटी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेतील रुग्णसंख्या जास्त असल्याची माहिती मिळताच घाटी प्रशासनाने तातडीने काही रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या.

साधरणत: 5 ते 12 वर्षे वयोगटातील या मुलींपैकी ३१ मुलींवर बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४ मध्ये तर उर्वरित ३६ मुलींवर आपत्कालीन लिथोट्रीप्सी कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली दाखल करण्यात आले. या वेळी बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रतिभा खैरे, डॉ. अमोल सुर्यवंशी, डॉ. समाधान प्रदीप, डॉ. सय्यद, डॉ. उबेर, डॉ. अमीर, डॉ. अंजू, डॉ. निला, डॉ. कुमेश, डॉ. अश्विनी, डॉ. निलेश आणि  वॉर्ड इंजार्च रजनी कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी मुलींची सुश्रृषा करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास झिने, महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह लोकप्रतिनिधी, नातेवाईक यांनी रुग्णालयात धाव घेतली.

नागरिकांचा आरोप

कासंबरी दर्गा भागातील रफीक कुरेशी यांनी मदरशा प्रशासनाने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच 70 मुलींना एकाच टेंपोतून कोंबून नेल्याने त्यांच्या जीवाशी खेळल्याचेही ते म्हणाले. तर मदरशा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.