
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. ही इमारत पालघरच्या जिल्हा परिषद इमारतीच्या धर्तीवर होत असून सुमारे 60 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वर्षभरात ही इमारत जलदगतीने उभी राहील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
राज्यमंत्री सत्तार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नजरीपाहणीची आकडेवारी आली आहे. कृषी आणि महसूल विभाग वस्तुनिष्ठ पंचनामे करत असून आतापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कोणत्या पिकाचे किती क्षेत्र बाधित झाले, याची माहिती पुढील पाच दिवसांत समोर येईल. ती राज्य शासनाला सादर केल्यावर मदत मिळेल, असे सत्तार यांनी सांगितले. पीक विम्या कंपन्यांचा घोळ मला अद्यापही कळाला नाही. कंपन्या म्हणतात, 72 तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर माहिती द्या तर शेतकरी म्हणतात, फोन काही लागत नाही, अॅपही कार्यान्वित नाही. त्यांच्या ऑनलाईन सिस्टीममध्येच घोळ दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऑफलाईन पंचनामे राज्य शासनाचे अधिकारी करतील. ते पंचनामे विमा कंपन्यांनी मान्य करावे. राज्य सरकार केंद्र सरकारला यासंबंधी निकषात बदल करण्याची विनंती करेल. शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला मदतीचा हात राज्य सरकार लवकरच देईल.
संभाजीनगर-नगर-पुणे या मार्गासाठी नव्या रेल्वेलाईनसाठी सर्वेक्षणाची मागणी राज्य शासनाच्या वतीने रेल्वेमंत्र्यांना करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मुंबईत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली असून त्यामुळे उद्योगवाढीला लाभ मिळेल, असे राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले.
पैठण येथे संतपीठाचे लोकार्पण!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी पैठण येथील ‘शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज संतपीठा’चे लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. शनिवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासोबत संतपीठ इमारतीतील सुविधांची पाहणी रोहयो व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विलास भुमरे उपस्थित होते.
1980 पासून हा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रकल्प रेंगाळत पडला होता. रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मंत्री भुमरे म्हणाले की, ‘आधुनिक गुरुकुलाची संकल्पना असलेल्या या संतपीठात सदाचार आणि चारित्र्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. धर्म आणि विज्ञान यांची सांगड घालून समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारी एक नवीन पिढी या आधुनिक गुरुकुलातून घडवली जाणार आहे. त्यामुळे आघाडी शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना दिली आहे. आता संतपीठाचे लोकार्पण होऊन 41 वर्षांचा लालफितीचा फेरा संपुष्टात येणार आहे. संतपीठात 5 परिचय अभ्यास प्रमाणपत्र कोर्सची सुरुवात होत आहे.

























































