ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थानवर दणदणीत विजय, मालिका 3-2 ने जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान व ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाने यजमान टीम इंडियाला धूळ चारत मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 37 धावांनी पराभव करत मालिका 3-2 ने जिंकली. मालिकेत दमदार फलंदाजी करणाऱ्या उस्मान ख्वाजाला सामनावीर व मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

पाचव्या व अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाची घट्ट पकड होती. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला उत्तम फलंदाजी करत उस्मान ख्वाजा व अॅरोन फिंचने 76 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ख्वाजाचे शतक व पीटर हॅण्ड्सकोम्बच्या अर्धशतकाने ऑस्ट्रेलियाला चांगल्या धावसंख्ये पर्यंत नेले मात्र मधल्या फळीतला त्यांचा डाव गडगडल्याने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 272 धावांवर रोखले.

हिंदुस्थानच्या फलंदाजीची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन, कर्णधार विराट कोहली, विजय शंकर, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा या चांगल्या फलंदाजांनी हिंदस्थानची घोर निराशा केली. अवघ्या 132 धावांत सहा विकेट पडल्याने हिंदुस्थानचा पराभव निश्चित झाला होता. मात्र सातव्या विकेटसाठी भुवनेश्वर कुमार व केदार जाधवने दमदार फलंदाजी करत 91 धावांची भागिदारी केली. मात्र दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 37 धावांनी पराभव केला.