संसदही आमच्यासाठी असुरक्षित, माजी महिला खासदाराचा मंत्र्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांवर पुरुष सहकाऱ्यांकडून लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र संसदेतही असा प्रकार घडत असेल याची आपण कल्पनाही केली नसेल. परंतु हे खरे असून याला माजी खासदार ज्यूलिया बँक्स (Julia Banks) यांनी वाचा फोडली आहे. ज्यूलिया यांनी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला असून या मंत्र्यांने मला चुकीच्या पद्धतीने हात लावून लैंगिक शोषण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरक्षेच्या मुद्द्यावरून हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. कामाची ठिकाणी असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेने या महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याच निमित्ताने माजी खासदार बँक्स यांनी आपल्यासोबत भर संसदेमध्ये घडलेला प्रसंग सांगितला आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी पुरुष खासदाराने माझ्या मांड्यावर चुकीच्या पद्धतीने हात फिरवला होता, असा आरोप बँक्स यांनी केला. मात्र बँक्स यांनी त्या खासदाराचे नाव स्पष्ट केलेले नाही. परंतु तो खासदार आता मंत्रिमंडळात मंत्री असल्याचे त्यांनी सांगितले.

मी आणि अन्य खासदार रात्रीच्या वेळी संसदेमध्ये मतदानाची वाट पाहत होतो. त्याच वेळी तो मंत्री माझ्या शेजारी येऊन बसला आणि आपला हात माझ्या मांड्यावर फिरवू लागला, तसेच तो याहून पुढे जाण्याचाही प्रयत्न करत होता, असे बँक्स यांनी सांगितले.

राजा समजून अत्याचार

दरम्यान, देशात सुरू असलेल्या आंदोलनात महिला खासदारही उतरल्या आहेत. संसदेमध्ये पुरुष खासदार स्वत:ला राजा समजून महिला खासदारांसोबत गैरव्यवहार करतात. काही खासदारांनी तर कामासाठी संसद सर्वात असुरक्षित स्थळ असल्याचेही म्हटले.