
>>डॉ. अनिल कुलकर्णी
भाऊसाहेब मिस्तरी यांची जीवनाचं वास्तव दर्शन घडवणारी ‘रंधा’ कादंबरी. भाऊसाहेब मिस्तरी यांनी ग्रामीण जीवनातील दुःख, दारिद्रय़, ग्रामीण जीवनाचे वर्णन, वाचकांच्या डोळ्यांसमोर वास्तव रूपात कल्पकता, स्वप्नरंजन, अलंकारिक भाषा याला रंधा मारून आपल्यासमोर एक अस्सल ग्रामीण सुबक कलाकृती पेश केली आहे. ग्रामीण भागातल्या संघर्षाची धार व ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या ओव्यांचा वापर करून मानवी संबंधांची अतिशय तरल उकल त्यांनी केली आहे.
अण्णा मिस्त्र्ााr यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. शेतकऱयांना शेतात लागणाऱया अवजारांचे अण्णा वर्षभर काम करत असे. ग्रामीण भागात 2-3 विवाह व 5-6 मुले असणे, भविष्यावर विश्वास ठेवणे, हे नवीन नाही. कमीत कमी गरजा बाळगत व आशावादी राहून जीवनाला ते सामोरे जातात, हे शिकण्यासारखं आहे. मुलेबाळे सुतारकाम करत वडिलांनाही मदत करत. आपल्या वडिलांचे कष्ट पाहून मुलेही दुःखी होत व वडिलांप्रती त्यांना आदरच वाटतो. वडील म्हणजे ‘सुखाचा सागर, कष्टाची भाकर, हक्काचे घर आयुष्याचा गर वाटतो. काटेरी फणस वरून, पण आतून गोड रस, कष्टाचा घामाचा वास, मनातलं झाड, आंब्याचे झाड, सावली देणारे झाड, जिवंत पाण्याचा झरा, थंडगार वारा, आयुष्याची वाट, एक कष्टाचा पाठ, कस्तुरीचा सुगंध, पहिल्या पावसाचा गंध, आनंदाचा पंद, तुपाची धार, सुट्टीचा वार आणि आयुष्याचा सार वाटतो.’
ग्रामीण भागात जनावर व औजार यांच्या भरवशावरच कुटुंब जगत होती व जगतात. ओबडधोबड लाकडाला रंधा मारल्यावरच बाजारात त्याला जास्त किंमत येते. आजही ग्रामीण भागात जुन्या परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी जपल्या जातात. विज्ञानामुळे प्रगती होत असली तरीही परिस्थितीमुळे काही शेतीच्या जुन्या पद्धती व अवजारांची पूजा केली जाते, त्याच्यावरच अनेकांचे संसार उभे असतात. माणसाचे स्वभाव, अंधश्रद्धा इतक्या सहजासहजी बदलत नाहीत. निर्जीव लाकडाला हवा तसा रंधा मारून सुबकता आणता येते, लाकडाचा बेढपपणा घालवून सुंदर आकार देता येतो. मानवी मनाचं तसं नाही. मानवी मनाला संस्काराचा रंधा आवश्यक असतो. शरीराला व मनाला वळण लागण्यासाठी शिस्तीचा रंधा आवश्यक असतो. मन परिवर्तन व मत परिवर्तन संस्काराचा हळूवार रंधा मारल्याने शक्य होते.
कादंबरीची भाषा ओघवती आहे. शब्दान्वय प्रकाशनची कलाकृती व नितीन खिलारे यांचं मुखपृष्ठ रंधा मारल्यासारखं सुबक झाले आहे.
रंधा
लेखक ः भाऊसाहेब मिस्तरी
प्रकाशक ः शब्दान्वय प्रकाशन
पृष्ठs ः 224, मूल्य ः 322 रुपये





























































