
<< सोहम पिंगळीकर
[email protected]
एखादा सिनेमा एका विशिष्ट काळाचा किंवा विशिष्ट भावनेचा प्रतिनिधी मानला जातो. जगलेल्या एका काळाला शोधत नॉस्टॅल्जियाचा अनुभव देणाऱ्या सिनेमांचा हा वेगळा ‘कल्ट’ जाणून घेऊया.
2008 मध्ये ‘जाने तू या जाने ना’मधून चारचौघांसारखा दिसणारा इम्रान खान बॉलीवूडमध्ये आला. त्याने अनेक रोमँटिक कॉमेडी चित्रपट केले; पण त्याच्या वाट्याला फारसं कौतुक आलं नाही. ‘अॅक्टिंग येत नाही, आमिरचा भाचा म्हणून चित्रपट मिळतात,’ अशी टिंगलच जास्त झाली. शेवटी त्याने इंडस्ट्रीच सोडली. पण आज पंधरा-सोळा वर्षांनी एक विचित्र गोष्ट घडते आहे. इंस्टाग्रामवर ‘जाने तू…, ब्रेक के बाद, आय हेट लव्ह स्टोरीज या त्याच्या चित्रपटांच्या रिल्स पुन्हा व्हायरल होत आहेत. लोक त्याच्यासारखे रोम-कॉम पुन्हा बनवावेत, अशी मागणी करत आहेत. एकेकाळी ‘फ्लॉप’ ठरलेल्या या अभिनेत्याला एक संपूर्ण पिढी अचानक का मिस करू लागली आहे?
कारण ती पिढी इम्रान खानला नाही, तर त्याच्या माध्यमातून त्यांनी जगलेल्या एका काळाला शोधत असते. कॉलेजचे दिवस, पहिलं प्रेम, मित्रांसोबतचा कट्टा, करिअरची पहिली चिंता हे सगळं त्या चित्रपटांमध्ये बंदिस्त झालं आहे. जो जीता वही सिकंदर, दिल चाहता है, जाने तू… असे प्रत्येक पिढीचे स्वतःचे सिनेमे असतात; पण त्यांच्यात जपली जाणारी भावना एकच असते – तारुण्य. कॉलेज बुडवून मित्रांसोबत पाहिलेले हे सिनेमे त्या तारुण्याच्या नशेची पुन्हा जाणीव करून देतात.
आधीच्या लेखांमध्ये आपण पाहिलं की, संवाद, पात्रं किंवा एखादा अभिनेता यांच्यामुळे चित्रपट कल्ट होऊ शकतो. पण अनेकदा एखादा सिनेमा एका विशिष्ट काळाचा किंवा विशिष्ट भावनेचा प्रतिनिधी मानला जातो आणि म्हणूनही कल्ट ठरू शकतो. इथे सिनेमाची कथा दुय्यम ठरते, कारण तो कथा सांगण्यापेक्षा एका टाईम मशीनचं काम करत असतो. असा सिनेमा प्रेक्षकांना त्यांच्या रम्य भूतकाळाचा पुन्हा अनुभव घेण्याची संधी देतो. तो कधी पाहिला, कोणासोबत पाहिला किंवा त्या काळी आपण कसे होतो, या स्मृतीला महत्त्व मिळतं.
काही सिनेमे हे कॉलेज, प्रेम अशा गमतीजमतींच्याही पलीकडे जातात आणि तरुणपणीचा आशावाद, विद्रोह यांचीही आठवण करून देतात. असे काही सिनेमे आपल्या सामाजिक स्मृतीचाच भाग होऊन जातात. याचं उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं. 20 जुलैला देशभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलनं केली. दिल्लीतील आंदोलनात शेकडो विद्यार्थी जखमी झाले. या पार्श्वभूमीवर हजारो लोकांच्या सोशल मीडियावर ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातील गाणी, संवाद आणि दृश्यं पुन्हा दिसू लागली. ही काही ठरवून घडलेली घटना नाही. आंदोलन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा चित्रपट पाहिलाच असेल, असंही नाही. मग एकाएकी हजारो लोकांना हा सिनेमा का आठवला?
याचं कारण त्या चित्रपटाच्या रचनेतच दडलं आहे. ‘रंग दे बसंती’ हा स्वतच दोन काळांमधला संवाद आहे. एका बाजूला भगतसिंग, राजगुरू, आझाद यांचा स्वातंत्र्यलढा; दुसऱ्या बाजूला न्याय मागणारे डीजे आणि त्याचे मित्र. सिनेमात भूतकाळाकडून प्रेरणा घेऊन वर्तमान जागं होतं, असं दाखवलं आहे. म्हणून आजही अन्याय, जबाबदारी आणि प्रश्न विचारायला उभं राहताना आजच्या पिढीला हा वीस वर्षांपूर्वीचा सिनेमा आठवतो. आज ‘जंतर मंतर’वर असणाऱ्या पिढीने पहिल्यांदा या सिनेमातून राजकीय चर्चा, आंदोलन, कॅन्डल मार्च अशी विद्रोहाची भाषा ऐकली आहे. म्हणून आजही हा सिनेमा तरुणाईच्या बंडाचा सांस्कृतिक शब्दकोश बनून उभा आहे. भविष्यासाठी लढताना भूतकाळाची आठवण आपसूक येते आणि तेव्हा हा सिनेमा नॉस्टॅल्जियासोबत लढण्याची ऊर्मीही देऊन जातो.
प्रत्येक पिढीला ही भावना देणारा कल्ट वेगळा असू शकतो; पण त्याच्याशी जोडले जाण्याची, त्याची आठवण काढण्याची प्रक्रिया मात्र सारखीच राहते. या सिनेमांमधून होणारं स्मरणरंजन वैयक्तिक राहत नाही, तर राजकीय बनतं. इतिहास पुस्तकातून लिहिला जातो आणि तो बदलताही येतो; पण गाणी, संवाद, कलाप्रकार आणि सिनेमांमधून सांस्कृतिक स्मृती मात्र जिवंत राहते. अनेकदा वर्तमान आशादायक वाटत नसताना ही गाणी किंवा सिनेमे आपल्याला स्वतःच्या आणि समाजाच्या भूतकाळाशी जोडतात. म्हणूनच ‘रंग दे’सारखा सिनेमा विद्रोह आणि आशेचा सांस्कृतिक ठेवा बनतो.
पण म्हणून रंग ‘दे बसंती’ची आठवण काढणं म्हणजे भूतकाळात रमणं असा अर्थ होत नाही. सिनेमा पाहताना ‘तो काळ बरा होता; तसे दिवस पुन्हा यावेत,’ इतकाच विचार सहसा नसतो. कुणालाच ते दिवस परत हवेत असं नसतं. त्यांना परत हवी असते ती त्या वयातली मैत्री, तो आशावाद, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं धाडस आणि जग बदलू शकतो हा हट्टी विश्वास. म्हणूनच विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले की रुबरू पुन्हा ऐकू येतं, भगतसिंग पुन्हा आठवतो आणि शेवटच्या फ्रेममध्ये निखळ हसणारी तरुणाई पुन्हा नव्या पिढीमध्ये जिवंत होते. ‘रंग दे’सारख्या सिनेमाचे खरे कल्टपण यातच असते. हा तरुणाईचा कल्ट भूतकाळ जपत वर्तमानाला अस्वस्थही करतो आणि आश्वस्तही करतो.
तुमच्या स्मृतीवर आणि विचारांवर नियंत्रण मिळवणं कोणत्याही सत्तेसाठी कठीण असतं. म्हणून जोपर्यंत तरुण पिढी प्रश्न विचारत राहील, तोपर्यंत कुठेतरी ‘रंग दे बसंती’सारखा एखादा कल्ट आठवण करून देत राहील.
‘ए साला, अभी अभी हुआ यकीन…
की आग है मुझमें कहीं!’
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)





























































