अश्लील वर्तन करणारा रिक्षाचालक गजाआड 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी रिक्षाचालकाला काही तासांत अटक केली.

पीडित मुलगी ही अंधेरी येथील एका खासगी शाळेत शिकते. सोमवारी ती वर्सोवा मेट्रो बस स्टॉप येथून रिक्षाने जाण्यासाठी निघाली तेव्हा अटक रिक्षाचालक हा पीडित मुलीला विविध प्रश्न विचारत होता. रिक्षातील आरशाकडे पाहून तो तिच्याकडे अश्लील इशारे करण्याचा प्रयत्न करत होता. त्या घटनेने मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. वांद्रे येथील एका खासगी महाविद्यालयाजवळ रिक्षा आल्यावर त्याने मुलीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मुलीने हात सोडवण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने मुलीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला.

पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती सांताक्रुझ पोलिसांना दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा नोंद केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. पोलिसांनी तपास करून रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करून विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले होते.