
सामना प्रतिनिधी, लातूर
शहरातील मळवटी रोड भागात रिक्षाचालकास मारहाण करुन चौघांनी लुटल्याची घटना घडली. 2 हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकरणी चारजणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या लूटमार प्रकरणी शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रिक्षा चालक बाबासाहेब वसंत भालेराव (रा. बौध्द नगर लातूर) याने तक्रार दाखल केली. मळवटी रोड भागात रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास त्याची रिक्षा चौघांनी थांबवली. ही रिक्षा खलीलचीच आहे का असे त्यास विचारले आणि रिक्षाची चावी काढून घेतली. आम्हाला खर्चासाठी पैसे दे म्हणून फिर्यादी व त्याच्या आत्याच्या मुलास शिवीगाळ केली.
लाथाबुक्यांनी मारहाण केली. चापटाने आणि फाईटने मारुन फिर्यादीच्या खिशातील दोन हजार रुपयांचा मोबाईल रोख 740 रुपये काढून घेतले. खंडू आणि कृष्णा अशी दोघांची नावे होती. पोलीसांनी चारजणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तरोणे हे करीत आहेत.





























































