
मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागांची शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन कार्य लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने या दोन्ही विभागांचा स्वायत्त दर्जा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळ, विद्या परिषद आणि तज्ञ समितीने केलेल्या पाहणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वायत्त दर्जामुळे या दोन्ही विभागांना नवीन अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा पद्धती सुधारणे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे अधिक सोपे होणार आहे. भौतिकशास्त्र विभागाने खगोलभौतिकी व पदार्थविज्ञान क्षेत्रात, तर रसायनशास्त्र विभागाने औषधनिर्मिती व नॅनोतंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय संशोधन केले आहे. या विभागांतील प्राध्यापकांनी अनेक पेटंट्सही मिळवले आहेत.


























































