अवनीवर झाडण्यात आलेल्या गोळ्या स्वरक्षणासाठी नाहीच; शवविच्छेदनातून वनविभागाच्या दाव्याचे खंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अवनी वाघिणीला शार्प शूटरने स्वसंरक्षणासाठी गोळ्या घातल्या, ती वाघिण आक्रमक झाल्याने पथकावर हल्ला करणार होती, त्यामुळे तिला गोळ्या घालण्याचा निर्णय घ्यावा लागला असा दावा वनविभागाने केला होता. मात्र, वनविभागाच्या या दावा फसवा असल्याचे अवनीच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. अवनी वाघिण दूर जात असताना तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचा वनविभागाच्या दाव्याला छेद देणारे निष्कर्ष अहवालातून स्पष्ट झाले आहे.

गेल्या शुक्रवारी ही वाघिण नरभक्षक असल्याचे सांगत तिला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या वाघिणीने दोन वर्षात 13 जणांचा बळी घेतला होता. तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत होती. मात्र, तिला गोळ्या घालण्यात आल्या. त्यानंतर तिला गोळ्या घालणे गरजेचे होते, असे वनविभागाने स्पष्ट केले होते. मात्र, अवनीच्या शवविच्छेदन अहवालातून हे दावे फोल असल्याचे स्पष्ट होत आहे. चार तज्ज्ञांनी हा अहवाल सादर केला आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.

वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी डार्टचा वापर करण्यात आला होता. डाव्या पायाजवळ हा डार्ट आढळून आला. मात्र, त्याचा वाघिणीवर काहीही परिणाम झाला नसल्याचेही अहवालतून स्पष्ट झाले आहे. वाघिणीला डार्ट मारल्यामुळे ती आक्रमक झाली आणि तिने पथकावर हल्ला चढवण्याचा पवित्रा घेतल्याने शूटर असगर अली खान यांनी तिला गोळ्या घातल्याचा दावा राज्याचे मुख्य वन्य जीवसंरक्षक ए. के. मिश्रा यांनी केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात गोळ्या घुसल्याची दिशा पाहता अवनी दूर पळत असताना तिच्यावर गोळ्या घालण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या अहवालाबाबत अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगत अधिक माहिती देणे त्यांनी टाळले.