
>> सुरेश चव्हाण
भंगार व कचरा वेचणाऱया, हॉटेलमध्ये काम करणाऱया, बांधकाम व ऊसतोडीचं काम करणाऱया अशा 14 हजार बाल कामगारांना त्यांच्या शैक्षणिक हक्कांसाठी प्रयत्न, वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी 57 वीटभट्टी शाळा, वर्गसंघर्ष व शोषितांचे प्रश्न आणि स्त्रियांसाठी ‘एकटी’ ही संस्था सुरू करणाऱ्या कोल्हापूरच्या ‘अनुराधा भोसले.’ लहानपणी गरिबी, बाल मजुरीचे बसलेले चटके लक्षात ठेवून गेली 30 वर्षे ‘अवनि (अन्न, वस्त्र, निवारा)’ या संस्थेच्या माध्यमातून त्या अथकपणे काम करत आहेत.
अनुराधाताई यांचं आजवरचं आयुष्य पाहिलं तर असं लक्षात येतं की, संघर्षाशिवाय आयुष्याने त्यांना काहीच दिलं नाही. त्यांच्या संघर्षाची सुरुवात लहानपणापासून झाली. त्यांचा जन्म अहिल्यानगर जिह्यातील श्रीरामपूर येथील भोकर गावचा. वडील प्राथमिक शिक्षक, आई अशिक्षित. त्यांना एकूण बारा भावंडं. त्यांपैकी त्या अकराव्या. पाचवीपासूनच त्या एका शिक्षकाच्या घरी राहून शिकू लागल्या. घरची कामं करून त्या शिक्षण घेत होत्या. पुढे त्यांना मुंबईत ‘निर्मला निकेतन’मध्ये शिकायची संधी मिळाली. तिथे राहून ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’ची पदवी घेतल्यावर त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे त्यांनी नोकरी केली, पण तिथे त्यांना समस्येच्या मुळाशी जाऊन काम करायला मिळत नव्हतं. त्या अस्वस्थ होत्या. याच दरम्यान त्यांचं लग्न झालं व त्या कोल्हापूरला आल्या. त्याच वेळी ‘वेरळा विकास प्रकल्पा’चं काम प्राध्यापक अरुण चव्हाण आणि सहकाऱयांनी सांगली जिह्यात सुरू केलं होतं व ते चांगलं चाललं होतं. 1994 मध्ये ‘अवनि (अन्न, वस्त्र, निवारा)’ संस्थेची स्थापना त्यांनी केली होती. या संस्थेत अनुराधा यांनी नोकरी करण्याचं ठरवलं. त्यांची झोकून देऊन काम करण्याची जिद्द पाहून चव्हाण यांनी अनुराधा यांना हेच काम कोल्हापुरात स्वबळावर करण्यास प्रवृत्त केलं आणि कोल्हापूर त्यांची कर्मभूमी बनली.
कोल्हापूर या पुरोगामी विचारांच्या शहरात आल्यावर अनुराधा यांच्या विचारांना वेगळी दिशा मिळाली. मान्यवरांचे विचार वेगवेगळ्या व्याख्यानातून ऐकायला मिळाले. वर्गसंघर्ष, शोषितांचे प्रश्न त्यांनी मुळापासून समजून घेतले. या क्षेत्रातील प्रश्नांची व्याप्ती खूप मोठी असल्याचं त्यांना जाणवलं. सांगलीच्या ‘वेरळा विकास प्रकल्पा’चं काम कोल्हापुरात सुरू करताना अनुराधाताई ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘रंकाळा बचाव’, ‘महिला संघर्ष’ अशा चळवळींतूनही काम करत होत्या. ‘अवनि’चं काम फक्त बसून करायचं काम नव्हतं. बाल कामगारांसाठी काम करायचं तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. मग त्यांनी कचरा वेचणाऱया, भंगार गोळा करणाऱया, हॉटेलला काम करणाऱया, बांधकाम व ऊसतोडीचं काम करणाऱया मुलांशी मैत्री केली. ‘तुम्ही शिकलंच पाहिजे नाहीतर तुमचं आयुष्य भंगार गोळा करण्यातच जाईल!’ हे मुलांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली.
अनुराधाताईंनी याचबरोबरीने कोल्हापूर जिह्यातील डवरी, लमाण, फासेपारधी, गोसावी समाजांच्या वस्त्यांवर जाऊन शाळेत न जाणाऱया मुलांना गोळा करून या वस्त्यांमध्ये शाळा सुरू केली. तेव्हा त्यांच्यापुढे प्रश्न होता, या शाळांसाठी शिक्षक कुठून आणायचे? तेव्हा त्या वस्त्यांच्या आसपासच्या महाविद्यालयीन मुला-मुलींकडे अनुराधाताई गेल्या. ज्यांना समाजकार्याची आवड होती, त्यांना प्रशिक्षण दिलं. अशा तऱहेने शाळांचे शिक्षक तयार झाले. त्यातून 36 शाळा त्यांनी सुरू केल्या व या मुलांचं थांबलेलं शिक्षण सुरू केलं. त्यांना जवळच्या शाळेत दाखल करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं.
पावसाळा संपला की, कोल्हापूरच्या आसपास वीटभट्टय़ा उभ्या राहतात. या भट्टय़ांवर काम करणारे कामगार आपल्या कुटुंबांसह या भट्टय़ांच्या आसपास मुक्काम ठोकतात. त्यामुळे आपलं गाव सोडून आलेल्या कामगार मुलांची शाळा बुडते. या मुलांसाठी 2002 साली त्यांनी वीटभट्टीवर शाळा सुरू केली. शिरोली, दोनवडे, वसगडे, सरनोबत वाडी इथल्या वीटभट्टय़ांवर दरवर्षी ऑक्टोबर ते मे महिन्यात शाळा भरते. सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत शाळा चालते. मुलांच्या मूळ शाळेतून त्या मुलांची माहिती, त्यांची शैक्षणिक कुवत याचीही माहिती मागवली जाते. मे महिन्यात त्यांची परीक्षा घेऊन निकाल तयार करून या मुलांना त्यांच्या मूळ शाळेत पाठवलं जातं. कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यात आज अशा 57 वीटभट्टी शाळा अनुराधाताई चालवतात.
वेगवेगळ्या क्षेत्रांत अनुराधाताईंचं काम सुरू आहे. बाल कामगारांसोबतच महिलांच्या हक्कांसाठीही त्यांनी आंदोलनं केली आहेत. विधवा, परित्यक्तांना निवृत्ती वेतन मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रंदिवस धरण धरलं होतं. त्यामुळे 3471 महिलांचं निवृत्ती वेतन सुरू झालं तसेच विधवा, घटस्फोटीता, परित्यक्ता म्हणून एकटं राहणाऱया महिलांसाठी 2012 साली ‘एकटी’ ही संस्था सुरू केली. या महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने बेघरांसाठी निवारागृह चालू केलं. ‘अवनि’त राहून आज 50 मुली शिक्षण घेत आहेत. त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच हस्तकला, संगीत, चित्रकला शिकविली जाते. ‘अवनि’ शासनमान्य असली तरी खूप प्रयत्न करूनदेखील शासनाचं अनुदान संस्थेला मिळत नाही. अमेरिकेतील ‘महात्मा गांधी पीस फाऊंडेशन’ने संस्थेला पायाभूत सुविधांसाठी मदत केली आहे. त्या संस्थेचे कार्यकर्ता स्कॉट कॅफोरा आयुष्यभरासाठी ‘अवनि’त काम करायला येऊन राहिले आहेत. अनुराधाताई अमेरिकेतील कॅलिफोर्निया, शिकागो, कॉलोराडो, कॅनडा या राज्यांमध्ये जाऊन तिथली बालगृहं पाहून आल्या. तिथल्या व्हॅनगार्ड विद्यापीठात भारतीय महिलांच्या प्रश्नांवर बोलल्या.
आज कोल्हापूर जिह्यातील वाशी येथील सेंद्रिय शेती प्रकल्पांतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या कामांमध्ये त्यांनी स्वतला झोकून दिलं आहे. सेंद्रिय शेती लागवड, देशी झाडांचं वृक्षारोपण, परिसरातील शेतकऱयांना ‘सेंद्रिय शेतीचे धडे’ त्या देत आहेत. सध्या त्या 50 शेतकरी संघटनांना प्रशिक्षित करत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण महिलाही सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी त्या चळवळ उभी करत आहेत. सगळ्या मुलांना त्यांच्या घरीच हक्काचं शिक्षण मिळावं आणि ‘अवनि’सारख्या संस्थांची समाजाला गरजच भासू नये, हे त्यांचं स्वप्न आहे म्हणून त्या पुनर्वसनावर भर देतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाचा ‘अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवलं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी अनुराधा यांना सहभागी करून त्यांचे समाजकार्य सर्वदूर पोहोचवलं आहे.