
कोरोना व्हायरसने अयोध्येतील रामनवमीलाही बाधित केले आहे. जिल्हा प्रशासनाने अयोध्येत भाविकांना प्रवेशबंदी केली असून 2 एप्रिलची रामनवमी यात्राही थांबवण्यात आली आहे. शरयू नदीत सामूहिक स्नानाला बंदी घालण्यात आली असून येणाऱया भाविकांना अयोध्येच्या सीमेवरूनच परत पाठवण्यात येणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. त्याचा परिणाम देशातील सण-उत्सवांवरही झाला असून अनेक ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अयोध्येत दरवर्षी रामनवमीचा उत्सव परंपरागत हर्षोल्हासात साजरा केला जातो. यंदा मात्र या उत्सवाला कोरोनाची नजर लागली आहे. रामनवमीला होणारी गर्दी टाळण्यासाठी अयोध्येत भाविकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. 25 मार्चपासून सुरू होणारी रामनवमीची यात्राही थांबवण्यात आली असून येणाऱया भाविकांना अयोध्येच्या सीमेवरूनच परत पाठवण्यात येणार आहे. शरयू स्नान तसेच आरती हे भाविकांचे आकर्षण, मात्र त्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
























































