
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
निवडणुकीआधी राम आणि निवडणुकीनंतर आराम हे आता बिलकूल चालणार नाही. राममंदिर निर्माण कधी होणार याची तारीख मला सांगा, असा इशारा देत देशाचे राजकारण आणि समाजकारण ढवळून काढणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मिशन अयोध्या’चीच सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. देशविदेशातील मीडियाने उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता राजकीय वर्तुळातही उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे काय पडसाद उमटणार, याची प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मीमांसा करत आहे.
उद्धव ठाकरेंच्या दोनदिवसीय दौऱ्यांचे मीडियाने ‘लाइव्ह’ प्रक्षेपण केल्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढचा निवडणूक प्रचारही काळवंडला गेला. इतकेच नाही तर, एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व काँगेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जाहीर सभा लाइव्ह करणाऱया चॅनेल्सनी त्या नेत्यांकडे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱयावेळी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपामध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. ‘ठाकरे इज न्यूज इज ठाकरे’ याची पुनर्प्रचीती उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याने दाखवून दिली. त्यानंतर त्यांच्या अयोध्या भेटीचे राजकीय पडसाद काय उमटतील याचा खल करण्यात राजकीय पक्ष गुंतले असल्याचे आज दिसून आले.
काँग्रेस आणि भाजपतर्फे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले गेले असले तरी, या दोन्ही पक्षांच्या गोटात घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येत शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आल्याने शिवसेना राष्ट्रीय स्तरावर आक्रमक पद्धतीने पक्षविस्तार करणार काय आणि तसे केल्यास आपले काय, या विचारात भाजप चिंताग्रस्त झाल्याचे दिसते. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने खासगीत बोलताना ही भीती सार्थ असल्याचे सांगितले.
हिंदू केडर शिवसेनेकडे आकर्षित होतेय!
अयोध्या मुद्द्याला केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच चालना मिळाली आहे. राममंदिराच्या अनुषंगाने भाजपची वर्षानुवर्षे पाठराखण करणारे हिंदू केडर आता शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचे या नेत्याने नमूद केले. मोदी सरकारने राममंदिराबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, अशी शक्यता या नेत्याने बोलून दाखविली. तर काँगेसच्या वर्तुळातही उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीची समीक्षा सुरू झाली आहे.
























































