
राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास (ट्रस्ट) स्थापन करण्यात आला आहे. या न्यासाने केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने केला आहे. अयोध्येत प्रभू श्री रामाच्या मंदिर उभारणीसाठी जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.
बाबा हरिदास यांची मूळ जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि तीच जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 18.5 कोटी रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार फक्त काही मिनिटांत झाला. एवढ्या कमी वेळात एका जमिनीचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढू शकतात? असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता.
न्यासाचे सचिव चंपत राय यांनी हे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादात आता अयोध्येतील साधूंनी देखील उडी घेतली आहे. विरोधकांप्रमाणे त्यांनीही या खरेदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलासा करावा अशी मागणी या साधूंनी केली आहे. जनसत्ता या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे नेते आणि अयोध्या जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल बैठक ठेवली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर साधूंनी या जमीन खरेदी व्यवहाराबाबत पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी जमीन व्यवहाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करताना म्हटलंय की काही दिवसांपूर्वी किंवा काही तासांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला चढ्या दराने विकण्यात आल्या. या व्यवहारातील 2 लाभार्थी हे भाजपशी निगडीत आहेत. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत तसेच भाजपचे वरिष्ठ नेतेही आहेत. यामुळे त्यांनी सांगावे की हा घोटाळा का झाला ?
अयोध्येचे ऋषिकेश उपाध्याय हे महापौर असून ते भाजपचे नेते आहेत. त्यांचा पुतण्या दीप नारायण याच्यावर आरोप करण्यात आला आहे की फेब्रुवारी महिन्यात त्याने 20 लाख रुपयांत जमीन खरेदी केली आणि मे महिन्यात हीच जमीन त्याने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला 2.5 कोटी रुपयांना विकली. ज्या जमिनीची खरेदी विक्री करण्यात आली ती जमीन नाजूल हक्क असलेली होती, म्हणजेच सरकारने ती भाडेतत्वावर दिलेली जमीन आहे, जिची खरेदी-विक्री करता येत नाही. सुलतान अन्सारी नावाच्या एका व्यक्तीने 2 कोटींची जमीन 18.5 कोटींना विकल्याचाही आरोप आहे. अन्सारी याने म्हटलंय की त्याचा व्यावसायिक भागीदार रवी मोहन तिवारी हा अयोध्येच्या महापौरांचा नातेवाईक आहे.
शुक्रवारी अयोध्येत साधूंची एक बैठक पार पडली. हनुमानगढीचे महंत ज्ञानदास यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीत सध्याचा न्यास भंग करून नव्या न्यासाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी चित्र स्पष्ट करावे अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. महंत ज्ञानदास यांनी सांगितले की या बैठकीला 150 साधू उपस्थित होते आणि त्यांनी एकमुखाने पंतप्रधानांनी याबाबत बोलावे अशी मागणी केल्याचे म्हटले आहे.





























































