ऐतिहासिक! 17 नोव्हेंबरपर्यंत राममंदिराचा फैसला!!

510

अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पूर्ण होऊन बुधवारी एक तास आधीच संपली असून, 23 दिवसांत 17 नोव्हेंबरपर्यंत फैसला सुनावण्यात येणार आहे. अनेक दशके प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघणार आहे. या ऐतिहासिक निकालाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळाचा वाद कायमचा निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे 6 ऑगस्टपासून  40 दिवस नियमित सुनावणी झाली. हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांनी बुधवारी युक्तिवाद केला. सायंकाळी पाच वाजता सुनावणी संपवणार असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. मात्र, एक तास आधीच दुपारी 4 वाजता या खटल्याची सुनावणी संपली.

उत्तर प्रदेशातील अधिकारी, पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द

अयोध्या प्रकरणातील ऐतिहासिक निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द केल्या आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकुल सिंघल यांनी यासंबंधीचे पत्रक जारी केले आहे. सणांमुळे प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने यापूर्वीच 10 डिसेंबरपर्यंत अयोध्येत जमावबंदी आदेश लागू केला आहे. बंदोबस्तात वाढ केली आहे.

मुस्लिम पक्षकारांच्या वकिलाने कोर्टात नकाशा फाडला

सुनावणीच्या अंतिम दिवशी सुप्रीम कोर्टात हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी हायहोल्टेज ड्रामाही रंगला.

जेवणाच्या सुट्टीनंतरही हा ड्रामा सुरू राहिला. घटनापीठाच्या परवानगीनेच मी हा नकाशा फाडला असे ऍड. राजीव धवन म्हणाले. यावर सरन्यायाधीश गोगोई यांनी संताप व्यक्त करीत धवन योग्य सांगत आहेत असे म्हटले. या विषयावर आता चर्चा नको, असेही बजावले.

सरन्यायाधीश गोगोई यांनी ऑल इंडिया हिंदू महासभेला आपले म्हणणे मांडण्याची परवानगी दिली. हिंदू महासभेच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ विकास सिंग यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीचा नकाशा असलेले दस्तावेज सादर केले. माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल यांनी लिहिलेल्या पुस्तकातील हा नकाशा आहे. मात्र, मुस्लिम पक्षकारांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांनी या नकाशाला आक्षेप घेतला. धवन यांनी नकाशा भरकोर्टात फाडून टाकला. अचानक घडलेल्या या घटनेने कोर्टात सन्नाटा पसरला.

निकाल राखून ठेवला

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती एस. ए. बोबडे,
न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. ए. नजीर यांचा समावेश आहे. आज सुनावणी संपल्याचे जाहीर करून सरन्यायाधीश गोगोई यांनी निकाल राखून ठेवला.

23 दिवसांनंतर 17 नोव्हेंबरपर्यंत ऐतिहासिक निकाल दिला जाणार आहे. सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या