
लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आझम चीमाचा (वय – 70) यांचा पाकिस्तानातील फैसलाबाद येथे मृत्यू झाला आहे. आझम चीमाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याच बोललं जात आहे. आझम चीमा 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा तसेच जुलै 2006 च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट आणि हिंदुस्थानातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता.
आझाम चीमाच्या मृत्यूमुळे पाकिस्तानात संशयाचं वातावरण निर्माण झाले आहे. चीमाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला नसल्याचा संशय अजूनही काही लोकांच्या मनात आहे. कारण मागच्या काही महिन्यात पाकिस्तानात अनेक दहशतवाद्यांचा अज्ञातांनी खात्मा केला आहे.
लश्कर-ए-तोयबाचे जे दहशतवादी मारले गेले, त्यामागे हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. परंतु हे आरोप हिंदुस्थानने फेटाळून लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2000 च्या सुरुवातीपासून चीमा त्याची बायको आणि दोन मुलांसह पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये राहत होता. अनेकदा तो त्याच्या सहा अंगरक्षकांसोबत एका लँड क्रूझरमध्ये दिसला होता.तसेच चीमा 2008 पासून पाकिस्तानातील बहावलपूर येथे एलईटी कमांडर म्हणून काम करत होता. त्याला लश्करचे वरिष्ठ अधिकारी झकी-उर-रहमान लखवी यांचे ऑपरेशनल सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच मुंबईवर 2008 साली 26/11 भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी आझम चीमा हा एक प्रमुख सुत्रधार होता.





























































