
आर्थिक चणचणीचा व्हिडीओ युटय़ूबवर व्हायरल झाल्यानंतर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी शनिवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरातील एका रस्त्याच्या कडेला कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी ढाबा चालवतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका माणसाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा कॉल आम्हाला आला होता. त्यानुसार आम्ही घटनास्थळी धाव घेतली असता आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती बाबा का ढाबाचे 80 वर्षीय मालक कांता प्रसाद असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांना तत्काळ सफदरजंग रुग्णालयात दाखल केले असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान काही दिवसांपासून कांता प्रसाद तणावाखाली होते असे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.
‘बाबा का ढाबा’ कसा झाला प्रसिद्ध
दिल्लीत मालवीय नगरातील एका रस्त्याच्या कडेला 80 वर्षीय कांता प्रसाद बाबा का ढाबा चालवत होते. आर्थिक चणचणीचा सामना करणाऱया कांता प्रसाद यांचा व्हिडीओ युटय़ूबर गौरव वासन यांनी व्हायरल केला होता. त्यामध्ये कांता प्रसाद रडत असून आपल्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. मात्र ते मदत करत नसल्याने मी आणि पत्नी ढाबा चालवून जगत असल्याचे सांगत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांना लोकांनी मोठय़ा प्रमाणात आर्थिक मदतही केली होती. त्यामुळे त्यांनी दिल्लीत बाबा का ढाबा नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते.



























































