भाजपला धक्का, केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच खासदाराने राजकारण सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून निवृत्तची घोषणा केली आहे. बाबुल सुप्रियो यांनी या संदर्भात एक पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. राजकारणात न राहता देखील सामाजिक कार्य करता येऊ शकते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘अलविदा! मी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करत नाहीये. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, सीपीआय(एम) या पक्षांचेही मला प्रवेशासाठी बोलावणे आलेले नाही. मला कोणाचा फोनही आलेला नाही आणि मी कुठेही जात नाहीये. मी फक्त एकाच टीमचा खेळाडू असून नेहमी एकाच टीमचे समर्थन करत राहील, ती म्हणजे भारतीय जनता पार्टी, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. तसेच सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात असायलाच हवे, असे थोडीच आहे’, अशी पोस्ट बाबुल सुप्रियो यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.

तसेच एक महिन्याच्या आत मी सरकारी निवास सोडणार असून खासदारकीचाही राजीनामा देत आहे, अशी घोषणाही बाबुल सुप्रियो यांनी केली.

मंत्रिमंडळातून डच्चू

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या बाबुल सुप्रियो यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. 7 जुलैला मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबुल सुप्रियो यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपले दु:ख मांडले होते.

विधानसभा निवडणुकीत पराभव

दरम्यान, राजकारणात येण्याआधी बाबुल सुप्रियो हे प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर होते. नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाने त्यांना मैदानात उतरवले होते, मात्र ते विजयी होऊ शकले नाहीत. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातूनही त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा होती.