
भाजप हा मित्रपक्ष म्हणून सुरुवातीला जवळ घेतो अन् नंतर अफजल खानासारखी मिठी मारतो, असा जोरदार प्रहार आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे भाजपचीच प्रतिमा मलिन होत असून याचे भान ठेवावे, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.
हिंगोली येथे दिव्यांग कल्याण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. महायुतीचा घटकपक्ष असतानाही जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तर स्पष्टच बोलले. एकीकडे सत्तेत सहभागी होण्यासाठी मिनतवार्या करायच्या. ‘मी पहिला फोन केला’, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. सत्तेत सहभागी झाल्यानंतर पाठीमागे निंदा करायची, ही भूमिका अजिबात योग्य नाही, असे आमदार कडू म्हणाले.
निदान प्रामाणिक तरी राहा
भाजपने अंतर्मुख होऊन काही गोष्टी समजून घेण्याची नितांत गरज आहे. आपण ज्यांच्यासोबत आहोत, निदान त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहा. आमच्यासोबत दगाफटका करू शकता, जनतेसोबत नाही, याचे भान तरी ठेवा. सोबत असलेल्या मित्रालाच पाडण्याच्या गोष्टी करतात. मित्र म्हणून जवळ घ्यायचे आणि अफजलखानी मिठी मारायची, असे भाजपचे धोरण असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.



























































