धक्कादायक…खेळाडूंना जेवणात मिळताहेत किडे-मुंग्या आणि केस

33

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विश्व कप आणि आशियाई खेळांमध्ये हिंदुस्थानला सुवर्ण पदक मिळावे यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या हिंदुस्थानच्या हॉकी टीमला निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे. जेवणात मटनाच्या जागी किडे-मुंग्या व केस मिळत आहेत. याचा परिणाम खेळाडूंच्या तब्येतीवर होत आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय हॉकी टीमचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी केला आहे. यासंदर्भात सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले असून त्यात त्यांनी खेळाडूंना मिळणाऱ्या अन्य सुविधांवरही प्रश्नचिन्ह उगारले आहे. यामुळे नेहमीच ऑल इज वेलचा नारा देणाऱ्या क्रीडा मंत्रालयाची झोप उडाली आहे.

सध्या हिंदुस्थानची हॉकी टीम बंगळुरुमधील साई (भारतीय खेळ प्राधिकरण) सेंटरमध्ये सराव करत आहे. पण येथे स्वच्छतेचा अभाव असून येथील किचनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जेवण बनवतानाही योग्य ती काळजी घेण्यात येत नसल्याने खेळाडूंच्या जेवणात अनेकवेळा किडे मुंग्या व केस सापडतात. तसेच जेवणात सकस आहाराचा अभाव असून अन्न तेलकट व चरबीयुक्त असते. याचा खेळाडूंच्या तब्येतीवरही त्याचा दुष्परिणाम होत आहे. असा आरोप सिंह यांनी हॉकी इंडियाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.

सिंह यांच्या तक्रारीनंतर हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष व हॉकी इंडियाचे माजी अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहले असून त्यात साई सेंटरमधील अस्वच्छतेचा लेखाजोगाच मांडला आहे. येथे मिळणाऱ्या निकृष्ट जेवणामुळे ४८ खेळाडूंमध्ये व्हिटामिनची कमतरता निर्माण झाल्याचे बत्रा यांनी म्हटले आहे. तसेच याचा परिणाम त्यांच्या खेळावरही होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या