
सामना प्रतिनिधी । बीड
बीड शहरातील पेठ विभागात सध्या अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत काळा हनुमान ठाणा ते लोणारपुरा चौक सिमेंट काँक्रीट रस्ता व नालीचे काम चालू आहे. सदरील काम हे अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात येत असून त्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र आज बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी दिले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आलेली आहे.
अंदाज पत्रकाप्रमाणे काळा हनुमान ठाणा ते लोणार पुरा चौक हे काम तीन टप्प्यात म्हणजे पहिला टप्पा 4 इंच मुरूम व खडीकरण पाणी मारून दबाई करणे, दुसरा टप्पा 4 इंच बेड काँक्रेट 7 ते 14 दिवस पाणी मारणे. तिसरा टप्पा 4 इंच सर्विस काँक्रेट म्हणजे फायनल लियर पुन्हा 7 ते 14 दिवस पाणी मारणे. वरील तीन टप्प्यात हे काम करणे अपेक्षित असताना सरळ 2 इंच मुरूम टाकून 4 इंचाचं थातूरमातूर पद्धतीचं काँक्रेट टाकून हे काम उरकण्याच्या बेतात असलेल्या सारडा कन्स्ट्रक्शनला नगरपरिषदेच्या गुत्तेदारांच्या काळ्या यादीत टाकून दर्जेदार कामे करणाऱ्या एजन्सींनाच स्पर्धा पद्धतीने कामे द्यावीत, व दलित वस्ती, हद्दवाढ या योजनेअंतर्गत केलेल्या कामांची देयके (बील) देण्यात येऊ नयेत, अशी मागणीही मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे.
अशाच पद्धतीने प्रभाग क्रमांक 22 मधील स्वराज्य नगर, सोमेश्वर नगर, प्रभाग क्रमांक 24 मधील धानोरा रोड परिसर, प्रभाग क्रमांक 25 मधील बार्शी नाका परिसरात देखील बोगस कामे करण्यात आलेली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बीड नगरपरिषदेला 85 कोटींचा निधी शहरांतर्गत रस्ते विकासासाठी मंजूर केलेला आहे. तसा शासन निर्णय बीड नगर परिषदेला प्राप्त झालेला आहे. ही 85 कोटींची कामेही एकाच ठेकेदाराला मिळण्याची शक्यता असल्याची भीती नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी व्यक्त केली आहे.मात्र 85 कोटींचा अंतर्गत रस्ते विकासाचा निधी अंदाजपत्रकाप्रमाणेच कामे करून घेऊन सत्कारणी लावला जाईल व बीड शहरात होणाऱ्या प्रत्येक सिमेंट रस्त्यावरील कामांवर लक्ष ठेवले जाईल व प्रत्येक चौकाचौकात बॅनर लावून रस्ता कशा पद्धतीने होणे अपेक्षित आहे याची माहिती नागरिकांना दिली जाईल असे नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.




























































