पूजा करताना महिला अंतर्धान; घराचे झाले मंदिर, भक्तांची रीघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बाडमेर

राजस्थानमधील बाडमेर येथे एक अजब घटना घडली आहे. येथे घरात देवपूजा करताना महिला अचानक गायब झाली. घरातल्यांनी शोधाशोध केली पण ती सापडलीच नाही. त्यामुळे दैवी चमत्कार समजून लोकांनी महिलेच्या घरालाच मंदिर बनवलं असून शेकडो भाविक महिलचे भक्त झाले असून साधु-संत आता येथे ध्यान धारणा करत आहेत. लीला देवी (26) असे या महिलेचे नाव आहे.

बाडमोर येथील गुडामालानी क्षेत्रातील रतनपुरा गावात लीला देवी आपल्या कुटुंबासह राहते. देवधर्मावर नितांत श्रद्धा असलेली लीला देवी देवघरात रोज तास न तास पूजा अर्चा करायची. पण काही दिवसांपूर्वी ती पूजाअर्चा झाल्यानंतरही देवघरातून बाहेर आली नाही. दरवाजा वाजवला असता आतून काहीच प्रतिसाद आला नाही यामुळे घरातल्यांनी दरवाजा तोडला. पण आतले दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. कारण आत लीला देवी नव्हतीच तर फक्त राखेचा ढिगारा पडलेला होता. दरवाजा आतून बंद असातनाही लीलादेवीचे गायब होणे, अचानक राखेचा ढिगारा खोलीत येणे या सगळ्यामागे नक्कीच दैवी चमत्कार असणार असे घरातल्यांना वाटू लागले. त्यानंतर गावभरात ही बातमी वणव्यासारखी पसरली आणि बघता बघता आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक लीलादेवीच्या दर्शनासाठी तिच्या घराबाहेर जमा झाले.

त्यानंतर साधुसंतांनीही लीलादेवीच्या घरीच बस्तान बसवले असून ते रोज ध्यान धारणा करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या मते लीलादेवीच्या अशाप्रकारे अचानक गायब होण्याच्या मागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आहे. पण लोकांच्या धार्मिक भावनाही जपणे हे देखील महत्वाचे असल्याने त्याचा तपास सुरू आहे. कदाचित ती घर सोडून निघूनही गेली असावी अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.