
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांना सोमवारी जामीन मंजुर करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी गुरुवारी निर्णय राखून ठेवला होता. देशमुख यांना याआधी ईडीच्या गुह्यात जामीन मिळाला आहे. आता सीबीआयच्या गुह्यातही जामीन मिळाल्याने ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार आहेत.
कथित 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी त्यांच्या प्रकृतीचा विचार करीत जामीन अर्जावर प्राधान्याने सुनावणी घेतली. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला हॉटेल-रेस्तराँ मालकांकडून खंडणी वसूल करण्यासाठी देशमुख यांनी सांगितले नव्हतेच. साक्षीदारांच्या जबाबावरून हे स्पष्ट होते, असा युक्तिवाद देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी केला होता. त्यावर सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आक्षेप घेतला होता. याप्रकरणी उच्च न्यायालय काय निर्णय देतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याप्रकरणात देशमुख यांना जामीन मिळाला आहे.






























































