बोठेला मदत करणाऱ्या वकिलावर आरोप निश्चिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याला हैदराबाद येथे मदत करणारा वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा याची कलम 212 नुसार दाखल गुह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली असून, त्याच्याविरुद्ध आरोप निश्चिती करण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात सहा मुख्य आरोपी आहेत. बाळ बोठेसह ज्ञानेश्वर उैर्फ गुड्डू शिंदे, आदित्य चोळके, फिरोज शेख, ऋषिकेश पवार व सागर भिंगारदिवे हे सहा आरोपी असून, त्यांच्यावर यापूर्वीच आरोप निश्चिती झाली आहे. तर शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) आणि नगरमधील महेश तनपुरे (रा. सावेडी) या चौघांवर बोठेला पसार असतानाच्या काळात मदत केल्याने कलम 212 नुसार आरोप निश्चिती झाली आहे. या प्रकरणातील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ही महिला पसार आहे. तर ऍड. जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. हैदराबाद) याने त्याच्यावरील आरोप निश्चितीला आक्षेप घेतला होता.

बोठेशी माझा काहीही संबंध नाही, तो ज्युनिअरशीपसाठी हैदराबादला आला होता, असे त्याचे म्हणणे होते. तर चंद्रप्पा व बोठे यांची आधीपासून ओळख होती व चंद्रप्पा याच्या सांगण्यावरूनच शेख इस्माईल, राजशेखर चकाली व अब्दुल रहेमान यांनी बोठेला मोबाईल व सीमकार्ड दिले होते, असा दावा रुणाल जरे यांच्यावतीने काम पाहणारे वकील ऍड. सचिन पटेकर यांनी केला होता. युक्तिवादानंतर न्यायालयाने चंद्रपा याचा अर्ज फेटाळला व त्याच्याविरुद्ध आरोप निश्चिती केली.