काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत ही घोषणा केली.
काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये आयोजित केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आहेत. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड केल्याची घोषणा केली. त्यानंतर उपस्थित आमदारांनी थोरात यांना शुभेच्छा दिल्या.
या बैठकीला काँग्रेसच्या 44 आमदारांसह मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आदी नेते हजर होते.
दुसऱ्यांदा विधिमंडळ नेतेपदाची संधी दिल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांचे आभार मानले. सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यरत राहू, असा विश्वास यावेळी थोरात यांनी व्यक्त केला. थोरात हे तब्बल 8 वेळा निवडून आलेले आहेत.
23 नोव्हेंबर रोजी विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली होती. त्या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता.






















































