
वातावरणातील बदलांमुळे पिकांना आणि विविध शेतमालाला फटका बसत आहे. मात्र, मोहनत केली आणिअभिनव प्रयोग केले तर यश नक्की मिळते हे संगमेश्वर तालुक्यातील एका शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी यावर्षी आपल्याच जागेत तब्बल 200 केळींची लागवड करुन केळी उत्पादनाचा अभिनव प्रयोग करायचे ठरवले आहे . सध्या बाजारपेठेत केळी 50 ते 60 रुपये डझन या दराने विकली जातात. मात्र, गावठी केळ्यांना मागणी आणि दर जास्त मिळत असल्याने मुळ्ये यांनी केळी लागवडीवर भर दिल्याचे सांगितले.
मौजे असुर्डे या दुर्गम गावात नैसर्गिक जलस्त्रोतांच्या आधारावर मकरंद मुळ्ये दरवर्षी मिरची, चवळी, पावटा, भुईमूग, पालेभाज्या, भेंडी, वांगी यांची लागवड करतात. या सर्व शेतमालाला संगमेश्वर ही एक मोठी बाजारपेठ असली तरीही मुळ्ये यांनी असंख्य खासगी ग्राहक जोडून ठेवल्याने त्यांना बाजारपेठेत मोठ्या भाजी विक्रेत्याकडे कमी दरात आपला शेतमाल विकण्याची वेळ येत नाही. विविध प्रकारची भाजी संगमेश्वर बाजारपेठत येईपर्यंत वाटेतच संपते. विक्रीचे गणित उत्तम साधल्याने उत्पादन घेण्यासाठी कितीही मेहनत घ्यायची तयारी असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले.
शेतात कामासाठी येणाऱ्या कामगारांसोबत मुळ्ये स्वतः मेहनत घेत असल्याने त्यांचे कामाचे आणि वेळेचे नियोजन बिघडले नाही. मुळ्ये यांनी गुरे पाळली असल्याने त्यांनी गोबरगॅससह शेतामध्ये रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांच्या वापरावर करण्यावर भर दिल्याने उत्पादन खर्च तर कमी येतोच. शेतमालाचा दर्जाही उत्तम राखला जात असल्याचा आपला अनुभव असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले. आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो , हे आपल्या ग्राहकांना माहिती असल्याने आपल्या शेतातील भाज्यांना असणारी मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने अधिकाधिक उत्पादन घेण्याची तयारी आपण ठेवल्याचे मुळ्ये यांनी सांगितले.
भाजीपाल्या बरोबरच सुपारीचे उत्पादनही समाधानकारक असून ठिबक सिंचनद्वारे मुळ्ये यांनी आपल्या बागेला पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्यावर फळबाग फुलवता येइल, या हेतूने मुळ्ये यांनी यावर्षी सुमारे 200 केळींची लागवड केली. यासाठी त्यांनी घरी असणाऱ्या जुन्या केळींमधूनच या रोपांची निर्मिती केली. गावठी केळ्यांची जात उत्तम असल्याने त्यापासून तयार झालेली रोपे घेऊन लागवड केल्याने खर्चही कमी झाला. या रोपांना सेंद्रिय खते आणि पाण्याचे योग्य नियोजन केले असल्याने रोपांची वाढ उत्तम झाली आहे . गावठी केळ्यांना 60 ते 70 रुपये डझन एवढा दर मिळत असल्याने आपल्याला केळी विक्री करण्याची चिंता नसल्याचे मकरंद मुळ्ये यांनी विश्वासाने सांगितले. निसर्गाला बिघडत्या पर्यावरणाचे अनेक फटके बसत असतांना मौजे असुर्डे येथील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये यांनी फळबाग लागवडीसाठी केलेले प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहेत.
























































