
टी-20 क्रिकेटच्या जगज्जेत्या इंग्लंडला दुबळ्या बांगलादेशकडून सहा विकेट्सनी पराभवाची झळ बसली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या 67 धावांच्या तडाखेबंद खेळानंतरही इंग्लंडला 156 धावांपर्यंतच मजल मारता आली. शेवटच्या चार षटकांत इंग्लंडला केवळ 21 धावाच करता आल्या. त्यातच चाचपडत खेळत असलेल्या सॅम करणने 11 चेंडूंत केवळ 6 धावा केल्यामुळे इंग्लंडला हाणामारीच्या षटकांत काहीही करता आले नाही. प्रत्युत्तरादाखल नजमुल हुसेन शांतोने 30 चेंडूंतील 51 धावांच्या धमाक्यामुळे बांगलादेशचा विजय सोप्पा केला. शाकीब अल हसन (ना. 34) आणि अतिफ हुसेनने (ना. 15) पाचव्या विकेटसाठी 46 धावांची अभेद्य भागी रचताना 12 चेंडू आणि 6 विकेट राखत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह बांगलादेशने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरी लढत 12 मार्चला तर तिसरी 14 मार्चला मिरपूर येथे खेळली जाणार आहे.



























































