
सामना प्रतिनिधी, मुंबई
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनियर असोसिएट या पदाकरिता 10 आणि 11 ऑगस्ट रोजी तर एलआयसीमध्ये विकास अधिकारी या पदाकरिता 11 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र पूरस्थितीमुळे या परीक्षेला बसणे शक्य नसल्याने या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशा विनंतीचे व्हॉटस्ऍप मॅसेज उमेदवारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवले. ही बाब स्थानीय लोकाधिकार समितीच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलाव्या यासाठी अनिल देसाई यांनी एलआयसी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांशी संपर्क साधला. या मागणीची दखल घेत या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यात या परीक्षा होणार होत्या. दरम्यान एमपीएससीची 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा आता 24 ऑगस्टला होणार आहे.
























































