
पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील भागात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने आता बारामतीतील बऱ्हाणपूर गावी ग्रामीण पोलीस विभागाचे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. गृहविभागाचे कार्यासन अधिकारी दिनेश सस्ते यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
बारामती तालुक्यातील वाढते औद्योगिकरण, शैक्षणिक संस्था, राजकीय भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाचे उपमुख्यालय उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात बंदोबस्त पोहोचविण्यासाठी इतर ठिकाणची मदत घ्यावी लागते. त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यास मनुष्यबळावर परिणाम होतो. त्यापार्श्वभूमीवर बारामतीतील बऱ्हाणपूर गावी उपमुख्यालय उभारल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्यास अतिरिक्त मदत होणार आहे. त्याशिवाय परिसरात विविध कारणास्तव तैनात करण्यात येणारा बंदोबस्ताचा वेळही वाचणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालक विभागाकडून शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे आता पुणे ग्रामीणचे उपमुख्यालय म्हणून बारामती नकाशावर येणार आहे. दक्षिण भागातील कायदा व सुव्यवस्था वाढविण्यासाठी गृहविभागाकडून बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय उभारण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यात येणार आहे. बऱ्हाणपूर पोलीस उपमुख्यालयाचे क्षेत्र आणि सीमा लवकरच घोषित केली जाणार असल्याचे गृहविभागाचे कार्यासन अधिकारी दीनेश सस्ते यांनी आदेशात नमूद केले आहे.



























































