
विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी आज हजारो आंदोलक बारसूत पुन्हा एकदा घुसले. प्रकल्पाच्या ठिकाणी आणि पंचक्रोशीत पोलिसांचा खडा पहारा आणि दडपशाही सुरू असल्यामुळे आंदोलकांनी रानवाटेने आंदोलनस्थळी धडक दिली. यावेळी संघटनेच्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, कितीही दडपशाही केली तरी प्रकल्प रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
कोकणची राखरांगोळी करणारा रिफायनरी प्रकल्प रद्द करावा यासाठी 25 एप्रिलपासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. बारसूच्या माळरानावर रखरखत्या उन्हात सलग पाच दिवस आंदोलन केले. मात्र 28 एप्रिल रोजी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये शेकडो आंदोलक जखमी झाल्यानंतर तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र आजपासून पुन्हा एकदा ग्रामस्थांनी ‘आर या पार’ची लढाई सुरू केली. पोलिसांनी आंदोलकांचे सर्व मार्ग बंद केल्यानंतर रानवाटांनी आंदोलक आज बारसू येथे धडकले.
भूमाफियांच्या भल्यासाठीच…
रिफायनरी प्रकल्प आणून भूमाफियांचे भले करण्याचा सरकारचा डाव आहे. बारसू परिसरात अनेक परप्रांतीय भूमाफियांनी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्या आहेत. आता राज्य सरकार या भूमाफियांकडून दामदुप्पट दराने जमिनी खरेदी करणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
पत्रकारांना बंदी आणि जामनगरला रिफायनरी दर्शन
बारसूच्या माळरानावर आंदोलन सुरू असताना प्रसारमाध्यमांनाही आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले. प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतही प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांना बंदी घालण्यात आली. दरम्यान, प्रशासनाकडून जामनगर येथील रिफायनरी दाखविण्यासाठी पत्रकारांचा दौरा काढण्यात येणार असल्याचे समजते.
शिवसेना आंदोलकांच्या मदतीला धावली
ग्रामस्थांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडून फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये डांबले जात असताना ग्रामस्थांच्या मदतीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष धावला. सुरुवातीला खासदार विनायक राऊत यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन धीर दिला.
आंदोलकांच्या पाच तुकडय़ा; पोलिसांना गुंगारा
बारसू प्रकल्प आणि परिसरात पोलीस बंदोबस्त असतानाही सुमारे दोन हजार ग्रामस्थ गनिमी काव्याने बारसूच्या माळरानावर घुसले. ग्रामस्थांनी आंदोलकांच्या पाच तुकडय़ा केल्या होत्या.रानवाटेने या तुकडय़ा पुढे सरसावल्या, मात्र मोकळय़ा मैदानात आंदोलक येताच पोलिसांनी दंडुके उगारत आंदोलकांना पांगवले. पोलिसांनी अमोल बोळे, विजय आरेकर,रमेश गोर्ले, अक्षय बोळे, आशीष बोळे,स्नेहल गोर्ले, मानसी बोळे आणि अमित चव्हाण यांना ताब्यात घेतले.
कोकणात प्रकल्प कुठेही नको
रिफायनरी प्रकल्प रेटण्यासाठी एक लाख नोकऱ्या मिळणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र स्थानिकांना केवळ चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्या दिल्या जाणार असल्याचे आतापर्यंतच्या प्रकल्पांतून समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पात हक्काच्या जमिनी तर जाणारच शिवाय आयुष्यभर पुरणारी शेती, बागायतीही वाया जाणार आहे. त्यामुळे कोकणात कुठेही रिफायनरी उभारू नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
प्रत्येक वेळी प्रदूषणकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारला जातो. अशा वेळी कोकणातून प्रकल्पांच्या विरोधात एक आवाज उभा राहिला पाहिजे. सध्या आमचे रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने सहभाग घेऊन आमची ताकद वाढवावी.
> सत्यजित चव्हाण, आंदोलक
प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध असताना पोलीस आमच्याविरोधात दंडुकेशाही करीत आहेत. बारसूच्या सडय़ावर प्रकल्पाचा विरोध करायला रखरखत्या उन्हात पाच हजार ग्रामस्थ जमतात याचा विचार सरकारने करायला हवा. दंडुकेशाही करून आमच्यावर अन्याय करू नये. आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत.
> सतीश बने, आंदोलक
























































