
कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध अधिक तीव्र होत असून प्रस्तावित प्रकल्पामुळे होणारे प्रदुषण, जैविक सृष्टीचा विनाश या कारणांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी उभे केलेल्या आंदोलनाला01 ‘दक्षिणायन’च्या वतीने प्रसिद्ध भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकारात महाराष्ट्रातील लेखक, कलावंतांनी पाठिंबा दिला आहे, अशी माहिती दक्षिणायन महाराष्ट्राचे निमंत्रक संदेश भंडारे, प्रमोद मुनघाटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
जैविक विविधतेने नटलेला कोकण हा मानवी अस्तित्वासाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा ठेवा आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांनी प्रदूषणकारी प्रकल्पांना प्राण पणाला लावून विरोध केला आहे. यापूर्वी नाणार येथील रिफायनरी प्रकल्पांना विरोध झाल्याने ते प्रकल्प सरकारला रद्द करावे लागले. परंतु बारसू येथे येऊ घातलेल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे समर्थन तथाकथित विकासाचे कारण दाखवून केले जात आहे. शाश्वत विकासाच्या पर्यावरणपूरक संकल्पनेला नाकारून नवभांडवलशाही प्रवृत्ती ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. साम्राज्यवादी शक्तींचा यामागील स्वार्थी व विनाशकारी हेतू ग्रामस्थांना समजून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी उभे केलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी दक्षिणायनतर्फे या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
डॉ. गणेश देवी, छाया दातार, राजन गवस, इब्राहिम अफगाण, प्रमोद मुजुमदार, रणधीर शिंदे, प्रफुल्ल शिलेदार, अमिताभ पावडे, कौतिकराव ठाले-पाटील, जयंत भीमसेन जोशी, छाया सावरकर, महेश एलपुंचवार, वसंत डहाके, अनुराधा पाटील, निरंज टाकले, संध्या नारे पवार, नितीन रिंढे, कुसुम अलाम, संजीवनी पावडे, निशा साळगावकर, अपर्णा फडके, डॉ. रावसाहेब कसबे, प्रभा गणोरकर, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, प्रभू राजगडकर, राम काळुंखे, दत्ता घोल, संजीव चांदोरकर, दीपा पळशीकर, रणजित मेश्राम, यशवंत मनोहर, प्रज्ञा पवार, प्रमोद मुजुमदार, अभय कांता, किरण गुरव, गोविंद काजरेकर, अनुराधा पाटील, माधव पळशीकर यांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे.





























































