
सामना ऑनलाईन । मुंबई
टीम इंडियाचे आयसीसी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य लढतीतच संपुष्ठात आल्यावर संघातील प्रमुख खेळाडूंत असलेले मतभेद उघड झाले होते. स्पर्धा संपल्याबरोबर उपकर्णधार रोहित शर्मा आपली पत्नी व मुलीला घेऊन एकटाच मायदेशी परतला आणि कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील शीत युद्धाची माहिती जगजाहीर झाली. आता वेस्ट इंडिज दौऱ्याच्या तोंडावर रोहित आणि विराट यांच्यातील मतभेद मिटवून त्यांना “हम साथ साथ है” असे वागायला लावण्यासाठी खुद्द हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पुढाकार घेणार आहेत. दोघांतील मनोमिलनासाठी बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी टीम इंडियासोबत अमेरिकेला जाणार आहेत. तेथे विंडीजविरुद्धच्या फ्लोरिडातील टी-20 लढतींपुर्वी व्यक्तिशः रोहित आणि विराटसोबत बोलणार आहेत.
हिंदुस्थानी संघ वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये, अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे एक तर शिकागो येथे दोन टी-20 सामने खेळणार आहे. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी चर्चा करुन दोघांचं मनोमीलन करणार आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही या बैठकीला हजर राहणार असल्याचं समजते. विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीच्या फलंदाजी क्रमावरुन दोघांमध्ये मतभेद झाल्याचं समोर आलं आहे.
विराट आणि रोहित दोघेही प्रगल्भ खेळाडू -बीसीसीआय
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघंही प्रगल्भ खेळाडू आहेत, त्यामुळे दोघांमधले मतभेद बाजूला ठेऊन संघासाठी एकत्र यायलाच हवे याची त्यांना जाण आहे, अशी अपेक्षा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हिंदुस्थानी संघासमोर आता वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 3 टी-20, 5 वन-डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंचा सुधारलेली कामगिरी पाहता टीम इंडियाला एक्योप्याने विंडीजचा सामना करावा लागणार आहे याची समज रोहित व विराट या दोघांनाही आहे. त्यामुळे ते त्यांच्यातील मतभेदाला तिलांजली देऊन हिंदुस्थानला या दौऱ्यात चमकदार यश मिळवून देतील असा विश्वास बीसीसीआयने व्यक्त केला आहे.



























































