BCCI Chief Selector Chetan Sharma : स्टींग ऑपरेशनमुळे संकटात आलेल्या चेतन शर्मांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआयचे (BCCI) मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा बोर्डाचे सचिव जय शाह यांनी तत्काळ स्वीकारला आहे. भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांचे एक स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सौरव गांगुलीबाबत खळबळजनक खुलासे केले होते.

17 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हे स्टींग ऑपरेशन प्रसिद्ध करण्यात आलं होतं, ज्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. या स्टींग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी हिंदुस्थानी क्रिकेटपटू हे तंदुरुस्त राहण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचाही दावा केला होता. डोपिंग चाचणीमध्ये पकडले जाणार नाही असे इंजेक्शन हे क्रिकेटपटू घेत असल्याचे शर्मा यांनी म्हटले होते. क्रिकेटपटू सामन्यासाठी तंदुरुस्त नसतील, तर तंदुरुस्त होण्यासाठी इंजेक्शन घेत असल्याचं शर्मांचे म्हणणे आहे. इंजेक्शन घेतल्याने 80 टक्के फिटनेस असतानाही ते खेळण्यास तयार होतात असे शर्मांनी म्हटले आहे.

या स्टींग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यातील कथित संघर्ष, विराट कोहलीला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले त्यावेळच्या घटना याबद्दलही स्टींग ऑपरेशनमध्ये सांगितलं होतं. चेतन शर्मा यांनी म्हटलंय की विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पण त्यांच्यातील अहंकार मध्ये येतो. ते दोघे अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखे सुपरस्टार आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील संबंधांबाबत भाष्य करताना चेतन शर्मा म्हणाले होते की ‘गांगुली यांनी कधीही रोहितची बाजू घेतली नाही, मात्र विराट कोहली त्यांना फारसा पसंत नव्हता.’