टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत, बीसीसीआयने ट्विटवर केले नव्या जर्सीचे अनावरण

ओमान आणि यूएईमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू होण्यासाठी जेमतेम चार दिवसांचा अवधी उरला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने बुधवारी ‘टीम इंडिया’च्या नव्या जर्सीचे आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून अनावरण केले आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही हिंदुस्थानी क्रिकेटपटू नेव्ही ब्ल्यू रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहेत.

‘बीसीसीआय’ने प्रदर्शित केलेल्या नव्या जर्सीत ऑफिशियल किट प्रायोजक म्हणून एमपीएलचा लोगो आहे. याव्यतिरिक्त ‘टीम इंडिया’चा प्रायोजक म्हणून ‘बायजूस’चाही लोगो आहे. ‘बीसीसीआय’ने ट्विटरवर प्रदर्शित केलेल्या फोटोमध्ये लोकेश राहुल, संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे नव्या जर्सीत दिसत आहेत.

18 ऑक्टोबरला होणार श्रीगणेशा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 18 ऑक्टोबरला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. या दिवशी टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हिंदुस्थानी संघ 24 ऑक्टोबरला दुबईत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करेल.

आपली प्रतिक्रिया द्या